योग्य पाऊले पडली तर देशाचा चेहरा शरद पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ डिसेंबर २०२१ । फलटण । भारताच्या सध्याच्या राष्ट्रीय राजकारणाच्या मध्यवर्ती पटलावर पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्याशिवाय आजच्या घडीला फक्त तीनच चेहरे आहेत. एक काँग्रेसमधील गांधी घराण्यातील सोनिया गांधी किंवा राहुल गांधी, दुसरे माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार व तिसर्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. काँग्रेस हा भारतीय राजकारणातील सर्वात जुना पक्ष आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यानंतर या पक्षाला आज तरी राष्ट्रीय चेहरा नाही. या दोघांनंतर नरसिंहराव 5 वर्षे पंतप्रधान होते (सन 1991 ते 1996). त्यांनी देशाची आर्थिक पत व व्यवस्था सांभाळण्यासाठी उदार आर्थिक धोरणे आणली. कारण त्यावेळी जागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय योग्यच होता. तथापि त्यावेळी त्यांचे सरकार हे यूपीएचे होते आणि त्याच्या प्रमुख होत्या सोनिया गांधी. त्यामुळे नरसिंहरावांनी कितीही चांगले निर्णय घेतले तरी ते त्या श्रेयाचे मानकरी होऊ शकले नाहीत व अर्थातच राष्ट्रीय चेहराही होऊ शकले नाहीत.

काँग्रेस पक्षाची सध्याची पडझड लक्षात घेता व आजही खेडोपाडी लोकांच्या मनात काँग्रेस पक्षच आहे हे वास्तव लक्षात घेता या पक्षाला सध्यातरी सर्वसमावेशक असा व्यापक चेहरा नाही. कारण काँग्रेसच्या नेतृत्त्वाबाबतची, अध्यक्ष होण्याबाबतची अस्थिरता यामुळे काँग्रेस पक्ष मोठा असूनही हा पक्ष मोदींना व भाजपला पर्याय होऊ शकत नाही. ममत बॅनर्जी त्यांच्या ‘‘युपीए’ आहेच कोठे?’ या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रीय चेहरा सध्या तरी होऊ शकत नाहीत. त्यामुळे देशातील काँग्रेस पक्षासह भाजप विरोधी पक्षांची आघाडी अस्तित्त्वात येणे आवश्यक असले तरी प्रादेशिक पक्षांच्या महत्त्वाकांक्षेमुळे या आघाडीचा राष्ट्रीय चेहरा होईल असे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे सध्या तरी शरद पवार हेच होय !

पवारसाहेबांचे देशातल्या सर्वच राजकीय पक्षाच्या नव्या जुन्या नेत्यांशी सौहार्दाचे संबंध आहेत. त्यामुळे भाजपला, विशेषत: मोदी – शहा यांना पर्याय म्हणून राष्ट्रीय राजकारणात शरद पवार हाच मोहरा आणि चेहरा उपयोगी पडेल असे सध्याचे तरी चित्र दिसत आहे. अर्थात पुन्हा युपीएचा प्रयोग यशस्वी झाला तर त्यात काँग्रेसला घ्यावेच लागेल. पण काँग्रेसने युपीएचे नेतृत्त्व करणे याला देशातील बहुसंख्य विरोधी पक्ष, प्रादेशिक पक्ष मान्यता देणे शक्य नाही. कारण काँग्रेस त्यांच्या नेतृत्त्वासाठी राहुल गांधी हा मोहरा देणार असतील तर तो राष्ट्रीय चेहरा होऊ शकणार नाही. म्हणून काँग्रेसने गांधी घराणे व देश याचा तारतम्याने विचार केला पाहिजे व गांधी घराण्यापेक्षा देश महत्त्वाचा आहे हे समंजसपणे मान्य केले तर हा पेच सुटू शकेल व शरद पवार हे नाव आघाडीवर राहील.

कोण आहेत शरद पवार ?

पावसाने शेतकर्यांच्या पिकाचा दुष्काळ हटतो, पावसाने नदी, नाले, ओढे, विहीरी, पाझर तलाव तुडुंब भरतात, पावसाने पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होते, पण असा एखादा पाऊस अचानक येतो आणि राजकारणातील दुष्काळ हटवतो. कार्यकर्त्यांची मांदियाळी तुडुंब भरते, मरगळलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाची टंचाई दूर होते. तरुणाई फिदा होते, असा पाऊस म्हणजे शरद पवार.

वयाच्या 81 व्या वर्षी हा हिरव्यागार तरुणाईच्या उत्साहातला तरुण नेता सातारला भर पावसात सभा घेतो आणि राज्याचा, कार्यकर्त्यांचा स्वाभिमान वाढवतो हे फक्त या वयात शरद पवारच करु शकतात. माणसांशी आणि मातीशी नाळ जोडलेला हा नेता घरातल्या सोफ्यापासून ते वावरातल्या वाफ्यापर्यंत वावर असणारा शांत, संयमी, मिश्कील, स्थितप्रज्ञ नेता म्हणजे शरद पवार. सामान्य कार्यकर्त्याला नावानिशी हाक मारुन कसं काय चाललंय तुझं? असं विचारणारा हा यशवंतराव चव्हाणांच्यानंतरचा पण त्यांच्या विचारांच्या मुशीत तयार झालेला आधुनिक महाराष्ट्राच्या स्वप्नांचा सौदागर म्हणजे शरद पवार.

81 वर्षांच्या आयुष्यात 55 वर्षे राजकारण, समाजकारणात त्यांनी व्यतीत केली आहेत. राज्यात आणि देशात अनेक सत्तास्थाने उपभोगली. त्यांच्या राजकीय जीवनात या पदावरुन त्यांनी महिला आयोग, महिलांना आरक्षण, सैन्य दलात स्वातंत्र्यानंतर प्रथमच महिलांना संधी, स्वत:चे मुख्यमंत्रीपद पणाला लावून मराठवाडा विद्यापीठ नामांतर घडवून आणले, मंडल आयोगाची देशात प्रथमच महाराष्ट्रात अंमलबजावणी केली. शेतकर्यांसाठी आणि शेतीसाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. देशाचे कृषीमंत्री असताना धाडसाने शेतकर्यांसाठी 72 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. औद्योगिक क्षेत्र आणि कृषी क्षेत्र यांचा मिलाप झाला पाहिजे, ही भूमिका त्यांनी देशात प्रथम अवलंबात आणली. शेतकर्याच्या घरातील एक तरी मुलगा कायमस्वरुपी नोकरीमध्ये गेला पाहिजे त्यासाठी त्यांनी आवश्यक ते शिक्षण घेतले पाहिजे हा आग्रह त्यांनी नेहमीच धरला.

महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रशासनात 11 वर्षे मंत्री असताना त्यांनी देशातल्या जवळपास सर्वच विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांची मैत्री जोपासली. त्यामुळे आज देशामध्ये सर्वपक्षांशी संवाद साधू शकतील असा एकमेव नेता म्हणजे शरद पवार आहेत. याची जाणीव माजी पंतप्रधान राजीव गांधी, माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी, माजी पंतप्रधान स्व.नरसिंह राव आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यासह सर्वांनाच होती व आहे. याचे कारण असे की, कोणत्याही राज्यामधला गंभीर प्रश्‍न असो किंवा देशाच्या एकतेच्या व अखंडतेच्या संदर्भात निर्माण झालेला प्रश्‍न असो तो सोडवण्यासाठी हे सर्वजण शरद पवारांना साकड घालतात, हे देशाच्या राजकारणाने अनेक वेळा पाहिलेले आहे.

राजकारण, समाजकारण या बरोबरच त्यांनी क्रिकेट आणि अन्य क्रीडा संघटना यांच्याशीही तेवढ्याच ताकदीने संबंध ठेवले. या क्रीडा संघटनांना प्रोत्साहन दिले. आज क्रिकेटच्या स्पर्धांमधला जो शानदारपणा आहे, थाट आहे, वैभव आहे आणि खेळाडूंच्या किंमती आहेत ही सर्व देणगी शरद पवारांची आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या सामन्यांना त्यांनी प्रायोजक मिळवून देण्यासाठी औद्योगिक क्षेत्राला आवाहन केले आणि ते सर्वांनी मानले. त्यामुळे क्रीडा, कला, संगीत, साहित्य, शेती, उद्योग, अर्थ, शिक्षण इत्यादी सर्व क्षेत्रातील त्यांचे जाणतेपण नेहमीच महाराष्ट्राला आणि देशाला पुढे नेणारे ठरले आहे.

सन 2019 सालच्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत साहेबांनी ज्या तरुणाईने राज्यात प्रचार केला त्यामुळे भल्याभल्या नेत्यांचीसुद्धा झोप उडाली होती. त्यांच्याविरुद्ध खालच्या पातळीवर जावून प्रचार करणार्या नेत्यांची उंची नसतानासुद्धा त्या टिकेला त्यांनी निवडणूकीच्या मतातून उत्तर दिले. आज महाराष्ट्रामध्ये त्यांनी जी तीन पक्षांची आघाडी केली आहे त्याच्यावर बरीच टिका होत आहे. कारण, अनेकवेळा राजकारणामध्ये किंवा सत्तास्थापनेमध्ये साहेबांच्या भूमिकेवर विश्‍वासार्हतेचा शिक्का फार कमी वेळा उमटला आहे. परंतु, आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांच नेतृत्त्व अजूनही त्यांच्यावर टिका करणार्यांना कळायचंं आहे. त्याचं चाणक्य प्रवृत्तीचे राजकारण हे फक्त महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आहे हे लवकरच काळ ठरवेल. पण एक मात्र नक्की की, सामान्यातला सामान्य कार्यकर्ता, शेतकरी, उद्योजक, सहकारी यांच्याशी त्यांची जी मैत्रीची नाळ आहे ती अफलातून आहे. आपले पाय आपण कितीही मोठे झालो तरी आपण ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीत असले पाहिजेत ही त्यांची भूमिका अनेक नेत्यांना आणि राजकारणामध्ये नव्याने येणार्यांना निश्‍चितपणे मार्गदर्शक आहे.

आजही या वयामध्ये त्यांना आपल्या सत्तेपेक्षा महाराष्ट्राची आणि तरुण पिढीची चिंता आहे. छत्रपतींचा, शाहु-फुले, आंबेडकरांचा, यशवंतरावांनी घडवलेला महाराष्ट्र जातीयवाद्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या पायाला जखम झाली तरीसुद्धा तरुण पिढीची पावले योग्य दिशेला जावीत यासाठी त्यांनी जिद्दीने आणि इर्षेने अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा कुरुक्षेत्रात ते श्रीकृष्णही झाले आणि अर्जूनही झाले आणि म्हणूनच महाराष्ट्रभर उसळलेली नव्या पिढीची तरुणाई यांच्यासह हजारो, लाखो कार्यकर्ते या महाचाणक्याला 81 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एवढेच म्हणतील,

साहेब, तुमची अनुभवी आणि जखमी पावले ज्या जिद्दीने आणि इर्षेने जिकडे वळतील त्या पावलांच्या मागं आमची महाराष्ट्राची कोट्यावधी पावले असतील, हीच तुम्हाला 81 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !

– रवींद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार, फलटण. (मो.9422400321)

(लेखक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष आहेत.)


Back to top button
Don`t copy text!