झंझावाती दौरा, शरद पवार पुन्हा पावसात भिजले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२३ । मुंबई । अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अनेक बडे नेते अजित पवार यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासमवेत काही मोजकेच नेते आणि आमदार उरले आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार यांना आजपासून आपल्या झंझावाती दौऱ्याला सुरुवात केली आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते नाशिकला पोहोचले असून, तिथे ते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहे. दरम्यान, शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले असून, सुप्रिया सुळे यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, आता पुन्हा एकदा राज्यातील वातावरण बदलणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

आज मुसळधार पावसात मुंबईहून नाशिककडे निघालेल्या शरद पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केलं. यादरम्यान, पावसाचे दिवस असतानाही दौऱ्यावर निघालेल्या शरद पवार यांचा पावसात भिजलेला एक फोटो सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे. तसेच ‘भाग गए रणछोड सभी, देख अभी खडा हूँ मै, ना थका हूँ, ना हारा हूँ, रण मे अटल खडा हूँ मै, या काव्यपंक्ती लिहिल्या आहेत. सगळे पळपुटे पळून गेले तरी, मी अजूनही उभा आहे. मी ना थकलोय, ना हरलोय, रणामध्ये अटलपणे उभा आहे, असा त्याचा उर्थ होतो. या माध्यमातून शरद पवार यांचा लढाऊ बाणा दर्शवण्यात आला आहे.

दरम्यान, आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही शरद पवार यांनी आपलं निवृत्तीचं वय अजून झालेलं नाही, असं ठणकावून सांगितलं होतं. मी वयाच्या ८२ व्या वर्षीही काम करू शकतो. मी अजून म्हातारा झालेलो नाही. मी ना टायर्ड झालोय, ना रिटायर्ड झालोय, अशा शब्दात निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवार यांना शरद पवार यांनी टोला लगावला होता.


Back to top button
Don`t copy text!