दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२३ । मुंबई । सध्या जी चर्चा तुमच्या मनात सुरू आहे, ती आमच्या कोणाच्या मनात सुरू नाही. अजित पवार आमदारांसह भाजपात जाणार, या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसे मजबूत करायचे, याकडे लक्ष देत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. सिंगापूर (जि. पुणे) येथे पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव (अण्णासाहेब) उरसळ यांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी ते मंगळवारी बोलत होते.
ते म्हणाले, राष्ट्रवादी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे लक्ष देत आहे. त्यामुळे अनेकांना जी जबाबदारी दिलेली आहे. ते त्यांच्या कामात व्यग्र आहेत. अजित पवारही त्यांचे काम करत आहेत व मी माझे दौरे करत आहे. मी ज्या वेळेस एखादे वक्तव्य केले असेल, तर त्यात कोणालाही फाटे फोडण्याचा अधिकार नाही. के. सी. वेणुगोपाल हे मला आणि उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यामध्ये त्यांचा असा सूर होता की, देशपातळीवर विरोधकांची एक बैठक व्हावी आणि काही कार्यक्रम तयार करावा, त्यासाठी ही बैठक होती.
‘आमची भूमिका मांडायला आमचे नेते मजबूत’
nआमच्या पक्षाची भूमिका तुम्ही मांडण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या पक्षाबद्दल काय ते बोला. आमच्याबद्दल बोलण्यासाठी आमच्या पक्षाचे नेते, प्रवक्ते मजबूत आहेत, या शब्दांत अजित पवार यांनी शिवसेना खा. संजय राऊत यांना नाव न घेता मंगळवारी सुनावले.
nउद्धव ठाकरे हे शरद पवार यांना भेटायला गेले होते. त्याचा संदर्भ देऊन आपल्या कुटुंबातील काही व्यक्तींवर भाजपसोबत जाण्यासाठी दबाव असल्याचे शरद पवार यांनी ठाकरेंना सांगितल्याचा उल्लेख खा. राऊत यांनी मुखपत्रात केला होता.
मला एकट्याला भाजपशी लढावे लागेल : ठाकरे
काँग्रेस नेते वेणुगोपाल हे सोमवारी उद्धव ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर गेले. त्यावेळी एका काँग्रेस नेत्याशी बोलताना ठाकरेंनी ‘आता मला एकट्यालाच भाजपविरोधात लढावे लागणार’ असे विधान केले आहे. तसेच, अगोदर माझ्या पक्षात गद्दारी करवली, आता इतर पक्षात गद्दारी करवतील, असेही म्हटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोण काय म्हणाले?
महाराष्ट्र ही संत-महात्म्यांच्या पुण्याईची भूमी आहे. त्यामुळे कोणताही भूकंप होण्याची सूतराम शक्यता नाही.
– अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही गडबड नाही. सर्वकाही ठीक आहे.
– अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
अजित पवारांकडून भाजपकडे कुठलाही अधिकृत प्रस्ताव नाही. त्यांना वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये.
– चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादीमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच शिवसेना-भाजपवर जोरदार पाऊस पडेल.
– गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री
उत्सुकता शिगेला अन् चर्चेवर अखेर पडदा
अजित पवार काय करणार? भाजपमध्ये जाणार की भाजपला पाठिंबा देणार या चर्चांना गेले तीन-चार दिवस आलेला ऊत, त्यातच सकाळपासून याविषयी ताणली गेलेली उत्सुकता अन् शेवटी त्यांनीच जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार, असे स्पष्ट केल्यानंतर नाट्यावर पडलेला पडदा असा घटनाक्रम मंगळवारी राजकीय वर्तुळाने अनुभवला.
अजित पवार यांनी मंगळवारी समर्थक आमदारांची बैठक बोलविली असल्याचे वृत्त आले. त्यांनी राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्या मिळविल्या असल्याच्या एका इंग्रजी दैनिकाच्या दाव्याने उत्कंठा अधिकच ताणली गेली.
अजित पवार विधानभवनातील कार्यालयात पोहोचले. तासाभरातच तिथे धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, नितीन पवार, शेखर निकम हे आमदार आले. अजितदादा घेतील त्या निर्णयासोबत आम्ही राहू, असे माणिकराव कोकाटे, अण्णा बनसोडे या आमदारांनी आधीच स्पष्ट केले होते.
या आमदारांशी चर्चा करून ते काय भूमिका घेणार याविषयी तर्क लढविले जात असतानाच अखेर त्यावर पडदा पडला.