स्थैर्य, फलटण, दि.२६ : सन 2020-2021 या चालू वर्षीच्या गळीत हंगामासाठी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसाला पहिली उचल प्रतिटन 2850 रुपये देण्याचे जाहीर केल्याशिवाय एकही साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होवू न देण्याचा इशारा शेतकरी संघटनेंतर्गत महाराष्ट्र किसान मंच कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांपैकी ज्यांनी गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाची एफआरपी प्रमाणे होणारी पूर्ण रक्कम दिली नाही त्या साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी गाळप परवाने कसे दिले असा सवाल करीत जिल्ह्यातील काही साखर कारखाने काटामारी करीत असल्याचा आरोप करीत वजन मापे निरीक्षक नक्की काय करताहेत अशी विचारणा करीत वजन मापे निरीक्षकांनी 48 तासाच्या आत सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे तपासून खात्री करण्याची मागणी शंकरराव गोडसे यांनी केली आहे.
एफआरपी 2850 रुपये एकरकमी देणार्या साखर कारखान्यांना आमचे सहकार्य राहील, शुगरकेन कंट्रोल अॅक्ट 1966 नुसार 14 दिवसात एफआरपी न देणार्या कारखान्याच्या विरोधामध्ये तसेच मागील वर्षात 2019-2020 मध्ये ज्यांनी एफआरपी दिली नाही त्या कारखान्याचे चेअरमन/मॅनेजिंग डायरेक्टर यांची गय शेतकरी संघटना करणार नाही, असे सांगून या साखर कारखान्याच्या ऊसतोड व ऊस वाहतुक करणार्या वाहनधारक व ऊसतोडी टोळ्या यांचे नुकसान झाल्यास व कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्यास राज्याचे सहकार मंत्री, साखर आयुक्त, जिल्हा प्रशासन आणि साखर कारखानदार जबाबदार राहतील असा इशारा शेतकरी संघटना किसान मंचचे कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे यांनी दिला आहे.
शेतकरी संघटना किसान मंच कार्यकारिणी मध्ये जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव, सातारा तालुकाध्यक्ष सोपानराव कदम, माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब जगदाळे, वाई तालुकाध्यक्ष दिलीप मांढरे. फलटण तालुकाध्यक्ष हसन काझी, खटाव तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव, कोरेगाव तालुकाध्यक्ष प्रल्हाद माने, पाटण तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील कराड तालुकाध्यक्ष यासिन पटेल यांचा समावेश असून किसान मंच कार्यकारिणीची बैठक साईदिप कन्स्ट्रक्शन, कोल्हापूर नाका कराड येथे नुकतीच झाली त्यामध्ये वरील प्रमाणे निर्णय झाल्याचे शंकरराव गोडसे यांनी सांगितले.