स्थैर्य, सातारा दि 7 : अकोला महानगरपालिकेच्या उपायुक्त सौ. रंजना गगे यांची सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी पदी वर्णी लागली आहे. गगे यांनी मंगळवारी दुपारी दीड वाजता सातारा पालिकेत येऊन पदभार स्वीकारला. त्यांनी कामावर हजर होताच शहरातील करोना संक्रमणाच्या परिस्थितीची माहिती घेतली. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, व नगरसेवक राजू भोसले व कर्मचार्यांनी नव्या मुख्याधिकार्यांचे पुष्पगुच्छ व कंदी पेढे देऊन स्वागत केले. रंजना गगे या 1992 च्या प्रशासकीय बॅचच्या अधिकारी असून त्यांना या पदाचा अठ्ठावीस वर्षाचा अनुभव आहे. मालवण, राजापूर येथे मुख्याधिकारी तर कल्याण डोंबिवली व अकोला महानगरपालिकेत त्यांनी उपायुक्त म्हणून काम केले आहे. नगरविकास विभागातून श्रेणी संवर्ग 1 च्या बदलीची ऑर्डर ईमेलद्वारे जिल्हा प्रशासनाच्या नगरपालिका संकलन कक्षाला सायंकाळी उशीरा प्राप्त झाली. त्यामध्ये अकोला महापालिकेच्या उपायुक्त रंजना गगे यांना सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी पदी बदली झाल्याचे आदेश होते तर माजी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बदलीचे ठिकाण निश्चित झालेले नाही. शंकर गोरे सध्या क्वारंटाईन आहेत.
मुख्याधिकारी गगे या मुळच्या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी दुपारी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच आस्थापना व आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना पाचारण करून त्यांच्याकडून सातारा शहरातील करोना संक्रमणाची परिस्थिती जाणून घेतली. तसेच संबधित परिसराची स्वच्छता व कंटेन्मेंट झोन तत्काळ बनवण्याची तयारी करा अशा सूचना कर्मचार्यांना केल्या. तसेच येत्या दहा तारखेला पालिकेची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वसाधारण सभा पार पाडण्याचे आदेश पालिकेला प्राप्त झाले आहेत. मात्र, व्हीसीची तांत्रिक अडचण असून तेवढे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नसल्याने सर्वसाधारण सभा होणार की नाही या विषयावर टांगती तलवार आहे. नव्या मुख्याधिकार्यांनी ही तांत्रिक अडचणं लक्षात घेतल्यावर आपण नगरपरिषद संचालनालयाचे मार्गदर्शन मागवू, असा तत्काळ तोडगा सुचविला.सातारा पालिकेच्या महत्वाच्या पदावर महिला अधिकारी व पदाधिकारी असा योगायोग जुळून आला आहे. नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या कार्यकाळाला आता साडेतीन वर्ष उलटली. चारच दिवसा पूर्वी मुख्य लेखापाल म्हणून आरती नांगरे यांनी पदभार स्वीकारला. आता पालिकेच्या मुख्याधिकारी पदी रंजना गगे, सभासचिव म्हणून हिमाली कुलकर्णी, अंर्तगत लेखापरीक्षक म्हणून कल्याणी भाटकर असे महिलाराज सातारा पालिकेत सुरू झाले आहे.