
स्थैर्य, फलटण, दि. २९ सप्टेंबर : फलटण येथील शनिनगर नवरात्रोत्सव मंडळाच्या (योद्धा ग्रुप) दुर्गामातेच्या भव्य विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ गुरुवार, दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते हा शुभारंभ सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रोहित शिंदे यांनी दिली.
फुलांनी सजवलेल्या रथामधून दुर्गामातेची मूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी नेण्यात येणार आहे. या शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सौ. प्रगती कापसे आणि उद्योजक सत्यजीत घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू असून, मंडळाला यंदा पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. मंडळाने पारंपरिक नागपंचमी उत्सवाची परंपरा जपण्यासोबतच, अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबांना मदत, महिलांसाठी गरबा, दांडिया आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करून सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. या विसर्जन मिरवणुकीत परिसरातील युवक, युवती आणि महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

