दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२२ । सातारा । येथील श्यामसुंदरी रिलीजस अँड चॅरिटेबल सोसायटीच्या के .एस. डी .शानभाग विद्यालयाचे 17 वर्षाखालील मुलींच्या बास्केटबॉल संघाने अतिशय सुरेख खेळाचे सादरीकरण करत विभागीय स्तरावरील विजेतेपदाचा बहुमान मिळवला असून आता हा संघ राज्य पातळीवर होणाऱ्या बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवडला गेला आहे.येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आणि सातारा जिल्हा अथेलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्पर्धेसाठी या मुलींच्या संघाला मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अभिजीत मगर आणि सहाय्यक प्रशिक्षक शंकर गायकवाड यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून ही विजयश्री खेचून आणली.
या यशाबद्दल व उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक विद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग यांनी कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.संचालिका सौ.आचल घोरपडे, विद्यालयाच्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि प्राचार्य सौ.रेखा गायकवाड ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच क्रीडा प्रशिक्षक अभिजीत मगर, पालक संघाचे अध्यक्ष प्रतिनिधी शिक्षक, शिक्षिका व पालकांनी कौतुक करून अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.