
फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शंकर मार्केट येथील नगरपालिकेच्या दवाखान्याला अचानक भेट दिली. कामकाजात हलगर्जीपणा केल्यास गय केली जाणार नाही, असा कडक इशारा देत त्यांनी प्रलंबित प्रश्नांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला.
स्थैर्य, फलटण, दि. 9 मार्च : फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आज शंकर मार्केट येथे असणाऱ्या नगरपालिकेच्या दवाखान्याला अचानक भेट दिली. नगराध्यक्षांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट दवाखान्यात एन्ट्री केल्याने, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडालेली पाहायला मिळाली.
‘पूर्वीसारखे काम आता चालणार नाही’
दवाखान्याची पाहणी करताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. “सर्वसामान्य फलटणकरांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यापूर्वी तुम्ही कसे काम करत होता, ते आता यापुढे अजिबात चालणार नाही. रुग्णांच्या सेवेत आणि कामकाजात कोणताही हलगर्जीपणा झाल्यास गय केली जाणार नाही आणि पुढील कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल,” असा सज्जड दम त्यांनी यावेळी दिला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क व पाठपुरावा
या अचानक भेटीदरम्यान, तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाकडे नगरपालिकेच्या दवाखान्याचे काही महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याचे नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. यावर तत्परता दाखवत समशेरसिंह यांनी दवाखान्यातूनच थेट आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला आणि हे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत, अशी मागणी केली.
तसेच, शहरातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि हे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावरून सुद्धा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

