“समशेरदादांचा ‘शब्द’ ठरला ‘प्रमाण’! पालिकेत येणाऱ्या नागरिकांना आता हक्काची ‘बैठक’ व्यवस्था; सावित्रीमाईंच्या जयंतीला दिला सुखद धक्का”


फलटण नगरपरिषदेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची होणारी गैरसोय आता थांबली आहे. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशाने जन्म-मृत्यू दाखला विभागाबाहेर बाकडी बसवण्यात आली असून, सावित्रीमाई फुले जयंतीचे औचित्य साधून ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली.

स्थैर्य, फलटण, दि. ०३ जानेवारी : फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला दिलेला शब्द आज सत्यात उतरला आहे. पालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या, विशेषतः जन्म-मृत्यू दाखल्यासाठी तासनतास उभ्या राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची होणारी फरफट थांबवण्यासाठी त्यांनी बैठक व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले असून, खुद्द नगराध्यक्षांनी या व्यवस्थेची पाहणी केली.

नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पालिकेच्या कारभारात गती आणण्यासोबतच नागरिकांच्या सोयीसुविधांकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली होती. जन्म-मृत्यू नोंदणी विभाग आणि दाखला घेण्यासाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. अनेकदा वृद्ध नागरिक आणि महिलांना तिथे ताटकळत उभे राहावे लागत असे. ही बाब लक्षात येताच नगराध्यक्षांनी संबंधित विभागाबाहेर तत्काळ बाकडी (बेंचेस) टाकण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

आज सावित्रीमाई फुले जयंतीच्या पवित्र दिवशी या आदेशाची अंमलबजावणी पूर्ण झाली. पालिकेच्या वऱ्हांड्यात आणि संबंधित विभागाबाहेर नागरिकांसाठी बाकडी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते मिलिंद नेवसे, नगरसेवक सचिन अहिवळे आणि पालिकेचे विविध अधिकारी उपस्थित होते.

पालिकेत आपल्या कामासाठी येणाऱ्या नागरिकाला सन्मानाची वागणूक आणि किमान बसण्याची व्यवस्था मिळाली पाहिजे, हा आपला आग्रह असल्याचे नगराध्यक्षांनी यावेळी स्पष्ट केले. या निर्णयामुळे सर्वसामान्य फलटणकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!