
-
नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह यांचा ‘मॉर्निंग वॉक’ दरम्यान जनसंपर्क
-
विमानतळ मैदानावर क्रिकेटपटूंशी साधला खुला संवाद
-
माजी खासदार रणजितसिंह आणि आमदार सचिन पाटलांच्या माध्यमातून क्रीडा संकुल उभारण्याची ग्वाही
स्थैर्य, फलटण, दि. २७ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महायुती) चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या प्रचारात वेगळेपण जपले आहे. आज पहाटे ६ वाजता विमानतळ परिसरात मॉर्निंग वॉक करत असताना त्यांनी तेथे सराव करणाऱ्या क्रिकेटपटूंशी थेट संवाद साधला आणि खेळाडूंच्या समस्या जाणून घेतल्या.
मैदानावर रंगल्या गप्पा
निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारफेऱ्या आणि सभांसोबतच समशेरसिंह यांनी थेट मतदारांशी वैयक्तिक संवाद साधण्यावर भर दिला आहे. आज सकाळी विमानतळ मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. खेळाडूंनीही आपल्या अपेक्षा आणि मैदानाची गरज यावेळी बोलून दाखवली.
भव्य स्टेडियमचे आश्वासन
खेळाडूंशी संवाद साधताना समशेरसिंह म्हणाले, “फलटणमध्ये खेळाडूंची संख्या मोठी आहे, पण सुविधांची वानवा आहे. आपण मला नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिल्यास, मी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या सहकार्यातून फलटण शहरात खेळाडूंसाठी एक भव्य आणि सुसज्ज स्टेडियम उभारण्यासाठी कटिबद्ध राहीन.”
शहरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर चमकता यावे, यासाठी हे स्टेडियम मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित खेळाडूंनी समशेरसिंह यांचे आभार मानत त्यांना निवडणुकीसाठी आणि पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

