
प्रमुख चौकांत उभारणार पक्की आणि स्वच्छ स्वच्छतागृहे; तोडफोड टाळण्यासाठी सिंटेक्सऐवजी आरसीसी टाक्या वापरणार. रणजितदादा आणि सचिन पाटलांच्या माध्यमातून निधीचा प्रश्न मिटवणार.
स्थैर्य, फलटण, दि. ३१ डिसेंबर : “फलटण शहरात कामानिमित्त येणाऱ्या महिला आणि पुरुषांची स्वच्छतागृहांअभावी होणारी गैरसोय आता थांबणार आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये ‘सुलभ शौचालय’च्या धर्तीवर ‘पे अँड युज’ तत्त्वावर अद्ययावत स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. ही स्वच्छतागृहे इतकी स्वच्छ असावीत की तिथे जाणाऱ्या कोणत्याही नागरिकाला किळस वाटता कामा नये,” असे स्पष्ट आदेश नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला दिले.
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या नियोजनाबाबत नगराध्यक्ष दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यासह आरोग्य आणि बांधकाम विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
नगराध्यक्षांनी दिले ‘हे’ ५ प्रमुख आदेश
बैठकीत नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी अधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे सक्त सूचना केल्या आहेत:
१. स्वच्छता आणि हायजीन: शहरातील प्रमुख चौकांमध्ये उभारण्यात येणारी स्वच्छतागृहे अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असावीत. ती वापरताना कोणत्याही महिला अथवा पुरुषाला घाण किंवा किळस वाटणार नाही, याची दक्षता घ्यावी.
२. तोडफोडमुक्त बांधकाम: स्वच्छतागृहे उभारताना ती भारतीय पद्धतीची (Indian Style) असावीत. यामध्ये पाश्चिमात्य पद्धतीची भांडी (Commode) न वापरता टाईल्स आणि पक्क्या बांधकामाचा वापर करावा, जेणेकरून भविष्यात होणारी तोडफोड टाळता येईल.
३. पक्क्या पाण्याच्या टाक्या: स्वच्छतागृहाच्या वर पाण्याच्या साठवणुकीसाठी प्लास्टिकच्या (सिंटेक्स) टाक्या न बसवता, आरसीसी किंवा पक्क्या बांधकामाच्या टाक्या बांधाव्यात. यामुळे टाक्या फोडण्याचे किंवा चोरीला जाण्याचे प्रकार घडणार नाहीत.
४. ‘पे अँड युज’ मॉडेल: शहरात ज्याप्रमाणे मोठ्या शहरांत ‘सुलभ शौचालये’ असतात, त्याच धर्तीवर फलटणमध्ये ‘पे अँड युज’ स्वच्छतागृहे सुरू करण्यासाठी जागांची पाहणी करून त्वरित आराखडा सादर करावा.
५. ग्रामीण जनतेची सोय: फलटण तालुक्यातून आणि ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने काम करावे.
निधीची कमतरता भासणार नाही
यावेळी बोलताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, “शहराच्या विकासासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून कोणत्याही योजनेला निधीची कमतरता भासणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. माजी खासदार रणजितसिंह हे शहरासाठी भरीव निधी आणण्यासाठी खंबीर आहेत, त्यामुळे प्रशासनाने फक्त चांगल्या कामाचे नियोजन करावे.”
