फलटणमध्ये ऊस वाहतुकीला शिस्त लागणार; नगराध्यक्ष समशेरदादांचा ‘अॅक्शन प्लॅन’! कारखान्यांना दिले ‘हे’ कडक आदेश


फलटण शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक. प्रत्येक कारखान्याला वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करण्याचे आदेश. ओव्हरलोड वाहतूक आणि साऊंड सिस्टीमवर बंदी. वाचा सविस्तर…

स्थैर्य, फलटण, दि. ०३ फेब्रुवारी : ऊस गाळप हंगामात फलटण शहरात होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आता खुद्द फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर (Shamsher Singh Naik Nimbalkar) यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी त्यांनी आज फलटण नगरपालिकेत तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, नगराध्यक्षांनी कारखान्यांना कडक आदेश दिले आहेत.

नगराध्यक्षांचे कारखान्यांना ३ प्रमुख आदेश:

वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी खालीलप्रमाणे सक्त सूचना दिल्या आहेत:

१. वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती: फलटण शहरातील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक साखर कारखान्याने आपला एक पूर्णवेळ कर्मचारी (Full-time Employee) नियुक्त करावा. या कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण नगरपालिका प्रशासनाकडे असेल.

२. ओव्हरलोड वाहतुकीला ‘ब्रेक’: फलटण शहरातून ऊस वाहतूक करताना हेवी (Heavy) अर्थात क्षमतेपेक्षा जास्त आणि अवजड ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश देऊ नये किंवा अशी वाहतूक टाळावी.

३. साऊंड सिस्टीमवर बंदी: ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर किंवा इतर वाहनांवर ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मोठ्या साऊंड सिस्टीम (Sound Systems) लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीला तालुक्यातील प्रमुख साखर कारखान्यांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यामध्ये:

  • श्रीराम सहकारी साखर कारखाना
  • स्वराज इंडिया साखर कारखाना
  • शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज लि.
  • न्यू फलटण शुगर वर्क्स (श्री दत्त इंडिया)

यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.

यावेळी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील जाधव (CO Nikhil Jadhav), नगरसेवक सचिन अहिवळे, रोहित नागटिळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या निर्णयांमुळे फलटण शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नगराध्यक्षांच्या या ‘अॅक्शन मोड’चे फलटणकरांमधून स्वागत होत आहे.


Back to top button
Don`t copy text!