
सातारा जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हा परिषद-पंचायत समिती उमेदवारांच्या मुलाखती संपन्न. या निवड समितीत फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना मानाचे स्थान. मंत्री आणि खासदारांच्या बरोबरीने जबाबदारी मिळाल्याने राजकीय वजन वाढले. वाचा सविस्तर…
स्थैर्य, फलटण, दि. २० जानेवारी : फलटण नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे राजकीय वजन आता केवळ तालुक्यापुरते मर्यादित राहिले नसून, संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा दबदबा वाढल्याचे आज दिसून आले. भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या अत्यंत महत्त्वाच्या निवड प्रक्रियेत आणि मुलाखत समितीत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना ‘मानाचे स्थान’ देण्यात आले असून, जिल्ह्याच्या दिग्गजांच्या पंक्तीत त्यांची वर्णी लागली आहे.
दिग्गजांच्या मांदियाळीत समशेरसिंह!
सातारा जिल्ह्यातील भाजपचे राजकारण ज्यांच्या भोवती फिरते, अशा बड्या नेत्यांचा समावेश असलेल्या कोअर कमिटीमध्ये फलटणच्या नगराध्यक्षांचा समावेश होणे, ही फलटण भाजपसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. या मुलाखत समितीमध्ये मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अतुल भोसले, माजी आमदार मदनदादा भोसले, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील (तात्या) काटकर यांसारख्या हेवीवेट नेत्यांचा समावेश होता. या सर्व दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
नुकत्याच झालेल्या फलटण नगरपरिषद निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली असून, त्याचेच बक्षीस म्हणून त्यांना थेट समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना जिल्हास्तरावरील यंत्रणेत सामावून घेतल्याचे बोलले जात आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांनी मुलाखतींचे कामकाज पाहिले.
या निवडीमुळे फलटण तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह दुप्पट झाला असून, समशेरसिंहांच्या वाढत्या राजकीय आलेखामुळे विरोधकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.
