
स्थैर्य, फलटण, दि. १९ नोव्हेंबर : फलटणच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा लोकनेते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीमुळे लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. समशेरसिंह यांना फलटण-मलटण परिसरातील नागरिकांमधून, तसेच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (खासदार गटाच्या) कार्यकर्त्यांमधून नगराध्यक्ष म्हणून पाहण्याची तीव्र इच्छा व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जोरदार ‘प्रचार वॉर’ सुरू केले असून, या माध्यमातून थेट ‘राजे गटा’ला आव्हान दिले जात आहे.
कार्यकर्त्यांमध्ये समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती, ती आता पूर्ण झाल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. समशेरसिंह यांचा ग्राउंड लेव्हलला असणारा दांडगा जनसंपर्क हे त्यांचे सर्वात मोठे बलस्थान मानले जात आहे. ते मतदार गाठीभेटीत मतदारांशी अगदी सहज आणि मुक्त संवाद साधत आहेत. त्यांच्या या साधेपणातून मतदारांमध्ये एक प्रकारची आपुलकीची भावना व्यक्त होताना दिसत आहे, ज्यामुळे प्रचारात त्यांना मोठा फायदा मिळत आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्त्वाला आता शहरातून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची जोड मिळाल्यास फलटण शहर विकासामध्ये आणखी वेगाने पुढे जाईल, अशा स्पष्ट भावना नागरिक व्यक्त करत आहेत. जुन्या पिढीच्या लोकनेत्यांचा वारसा आणि नव्या पिढीचा जोश घेऊन मैदानात उतरलेल्या समशेरसिंह यांच्याकडून विकासाच्या मोठ्या अपेक्षा फलटणकरांना आहेत.
दुसरीकडे, शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना ते कसे आव्हान देणार, हा प्रश्न सध्या मतदारांमध्ये औत्सुक्याचा विषय बनला आहे. दोन नाईक निंबाळकर घराण्यातील ही थेट लढत फलटणच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. समशेरसिंह नाईक निंबाळकर आपल्या लोकसंपर्काच्या आणि वडिलांच्या कार्यांच्या पुण्याईच्या जोरावर ‘नेत्यां’ चा वारसा पुढे नेत, नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत कशी बाजी मारतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

