‘वारकरी आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ देऊ नका’; नगराध्यक्ष समशेरसिंह यांचा अधिकाऱ्यांना इशारा; पालखी सोहळा व घोडा यात्रेबाबत पालिकेत आढावा बैठक


फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि महानुभाव पंथाच्या घोडा यात्रेच्या तयारीबाबत पालिकेत विशेष आढावा बैठक घेतली. वारकरी आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्ते, पाणी आणि स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या.

स्थैर्य, फलटण, दि. 10 मार्च : आगामी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि महानुभाव पंथाच्या प्रसिद्ध ‘घोडा यात्रे’च्या पार्श्वभूमीवर, फलटण नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्यातून येणाऱ्या वारकरी आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्याचे सक्त निर्देश नगराध्यक्षांनी प्रशासनाला आणि ठेकेदारांना दिले आहेत.

१७ जुलैला फलटणमध्ये पालखीचा मुक्काम

यंदाचा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा ८ जुलैला आळंदीहून प्रस्थान करत असून, १७ जुलै रोजी हा सोहळा फलटण मुक्कामी येणार आहे. या धर्तीवर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आतापासूनच प्रशासकीय पूर्वतयारी सुरू केली आहे. वारकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणी आणि मार्गक्रमण करताना कोणतीही असुविधा होऊ नये, यासाठी त्यांनी संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेतली.

रस्ते, पाणी आणि स्वच्छतेवर भर; अधिकाऱ्यांना सक्त ताकीद

या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांचे अधिकारी, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे, वारकऱ्यांसाठी मुबलक व शुद्ध पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आणि शहरात स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करणे, याबाबत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना विशेष काळजी घेण्याविषयी इशारा दिला आहे. कामात हलगर्जीपणा केल्यास खपवून घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

महानुभाव पंथीयांच्या ‘घोडा यात्रे’चेही चोख नियोजन

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबतच, महानुभाव पंथीयांची ‘दक्षिण काशी’ अशी ओळख असलेल्या फलटण शहरात दरवर्षी होणारी ‘घोडा यात्रा’ अत्यंत प्रसिद्ध आहे. या बैठकीत या घोडा यात्रेच्या नियोजनाबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लाखो भाविक फलटणमध्ये दाखल होत असतात. त्यामुळे शहरात येणाऱ्या या भाविकांचीही कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने चोख नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश नगराध्यक्षांनी यावेळी दिले.


Back to top button
Don`t copy text!