
-
मॉर्निंग वॉकनंतर गिरवी नाका येथे रंगली ‘चाय पे चर्चा’
-
नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकरांचा ज्येष्ठ नागरिकांशी मुक्त संवाद
-
रणजितसिंह आणि सचिन पाटलांच्या माध्यमातून शहरात ‘वॉकिंग ट्रॅक’ उभारणार
स्थैर्य, फलटण, दि. २८ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचे (भाजपा-राष्ट्रवादी) नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी वेगळा पायंडा पाडला आहे. सभा आणि रॅलींच्या पलीकडे जात त्यांनी थेट मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. आज सकाळी मॉर्निंग वॉल्कनंतर त्यांनी गिरवी नाका येथे ज्येष्ठ नागरिकांसोबत “चाय पे चर्चा” करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
गिरवी नाक्यावर रंगल्या गप्पा
समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपली सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे व्यायामाने केली. त्यानंतर गिरवी नाका परिसरात जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या घोळक्यात जाऊन त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. चहाचा आस्वाद घेत त्यांनी ज्येष्ठांच्या आरोग्याच्या आणि शहराच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी नागरिकांनीही आपल्या अपेक्षा मनमोकळेपणाने मांडल्या.
‘जॉगिंग आणि वॉकिंग ट्रॅक’चा संकल्प
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगत समशेरसिंह यांनी महत्त्वाचे आश्वासन दिले. ते म्हणाले, “आपण नगराध्यक्ष म्हणून मला सेवा करण्याची संधी दिल्यास, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज ‘जॉगिंग आणि वॉकिंग ट्रॅक’ निर्माण केले जातील. नगरपरिषदेच्या माध्यमातून आरोग्य सुविधांना प्राधान्य दिले जाईल.”
या थेट संवादामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. केवळ आश्वासने न देता समस्या ऐकून घेणाऱ्या उमेदवाराला साथ देण्याचा सूर यावेळी उमटला.
