लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी समशेरदादा देणार जोरदार टक्कर


स्थैर्य, फलटण, दि. 18 नोव्हेंबर : फलटण नगर पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची अधिकृत उमेदवारी निश्चित झाली आहे. शहरातील भाजपच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून मोठा पाठिंबा मिळत असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. पक्षामध्येही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला जात असून स्थानिक संघटनांकडून त्यांना जोरदार पाठींबा मिळत आहे.

पालिका प्रशासनातील दांडगा अनुभव आणि भूमीस्तरावरची त्यांची ओळख हा त्यांच्या उमेदवारीचा मुख्य आधार मानला जातो. अनेक वर्षांपासून स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी केलेले काम आणि लोकसंग्रह याचा लाभ यंदाच्या निवडणुकीत होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना ते जोरदार टक्कर देणार हे आता सुस्पष्ट झाले आहे. दोन्ही प्रभावशाली घराण्यांतून येणारे उमेदवार असल्याने ही लढत शहरातील प्रमुख चर्चेचा विषय ठरत आहे. दोघांचेही स्वतंत्र मतदार वर्ग आणि मजबूत संघटनात्मक बांधणी असल्याने निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हं आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातील मुख्य भागातून प्रचार दौरा केला. या दौऱ्यात सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, तरुण वर्ग यांच्याकडून मिळालेला पाठिंबा प्रकर्षाने जाणवला. आगामी दिवसांत प्रचार अधिक जोमाने सुरू राहणार असून फलटणमधील राजकीय समीकरणे नव्या वळणावर जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.


Back to top button
Don`t copy text!