दैनिक स्थैर्य । दि.०२ जानेवारी २०२२ । सातारा । नारळावरील कुस्ती जिंकायची आणि हिंदकेसरी पैलवानाशी लढत दिल्याचे सांगायचे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे केविलवाणी वक्तव्य आहे. नारळावरील कुस्ती मारून राणे हिंदकेसरी पैलवानाशी बरोबरी केल्याचा आव आणत आहेत,” अशी सडेतोड टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त राज्यात व जिल्ह्यात राबविलेल्या महत्वाच्या योजना व निर्णयांची माहिती देण्यासाठी शासकिय विश्रामगृहात मंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नारायण राणेंनी वाघाच्या शेपटाला पकडलंय आणि त्याला सिंधुदूर्ग जिल्हा बँकेत जाण्यापासून रोखतात, असे कार्टुन प्रसिध्द झाले आहे. याविषयी मंत्री देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, ”गावाकडे नारळावरील किंवा बत्ताशावरील कुस्ती असते. त्याप्रमाणे नारळावरील कुस्ती जिंकायची आणि हिंदकेसरीला लढत दिली असे सांगायचे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे केविलवाणी वक्तव्य आहे.”
”बत्ताशा व नाराळावरील कुस्ती मारून ते जर हिंदकेसरी पैलवानाशी बरोबरी केल्याचा आव आणत आहेत. मुळात जिल्हा बँकेची निवडणुक ही मर्यादीत मतदारांची असते. त्यांनी जनरल निवडणुकीसाठी पुढे यावे, त्यांना कोकणातील व सिंधुदूर्गची शिवसेना काय आहे, हे तेथील शिवसैनिक व जनताच दाखवून देईल,” असे प्रतिउत्तर त्यांनी केले.