बीडच्या राजकारणाला हादरा! जिल्हा बँकेतील सेवा संस्थांचे सर्वच अर्ज बाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,बीड,दि २३: बीडच्या राजकारणाला हादरा देणारी एक गोष्ट घडली आहे. याचे निमित्त आहे जिल्हा मध्यवर्ती बँक. सेवा संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यासाठी संबंधित संस्था ‘अ’ किंवा ‘ब’ वर्गातीलच असायला हवी हा नियम आहे. या नियमामुळे सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वचे सर्व ८७ उमेदवारांचे अर्ज बाद झालेत. यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठा पेच निर्माण झाला आहे. इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद झाले आहेत. ७३५ सेवा संस्थांपैकी अवघ्या १३ संस्थांचे लेखा परिक्षण अ किंवा ब वर्गात असल्याचे सांगण्यात आले.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागल्यानंतर १९ जागांसाठी तब्बल १६० जणांनी २१४ उमेदवारी अर्ज दाखल केले. या संस्थेच्या सेवा संस्था मतदारसंघातून तब्बल ८७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सर्वच पक्षांच्या अनेक मातब्बरांचा समावेश आहे. आज उमेदवारी अर्ज छाननी सुरू झाली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली.

सेवा संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी संबंधित उमेदवार हा ज्या संस्थेमध्ये सदस्य आहे, त्या संस्थेचे ऑडीट हे ‘अ’ किंवा ‘ब’ असायला हवे. परंतु जिल्ह्यातील ७३५ सेवा संस्थांपैकी अवघ्या १३ संस्थांचे लेखापरिक्षण हे ‘अ’ किंवा ‘ब’आहे. बाकी सर्व संस्था या ‘क’ वर्गात येतात. त्यामुळे डीसीसी बँक निवडणुकीच्या उपविधी नियमानुसार सेवा संस्था निवडणुकीत दाखल करण्यात आलेले ११ जागांसाठीचे ८७ अर्ज बाद झालेत.

निवडणूक निर्णय अधिकारी रविकिरण देशमुख आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी गोपालसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सकाळी ११ वाजल्यापासून छानणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. या दरम्यान अर्ज बाद होऊ नये म्हणून वकिलाच्या माध्यमातून निवडणूक अधिकाऱ्यांसमोर युक्तीवादही झाला. परंतू बँकेच्या उपविधी नियमानुसार अधिकाऱ्यांनी संबंधित ८७ उमेदवारांचे अर्ज बाद केले.

यांचे झाले अर्ज बाद
यामध्ये विजयसिंह पंडित, बाबूराव सिरसट, फुलचंद मुंडे, महेंद्र गर्जे, वसंत सानप, अशोक लोढा, सत्यभामा बांगर, दशरथ वनवे, राजेंद्र मस्के, दाजीसाहेब लोमटे, ऋषिकेश देशमुख, वैजिनाथ मिसाळ, जयदत्त धस, मंगल सानप यांच्यासह अकरा जागांसाठी उमेदवारांनी ८७ अर्ज दाखल केले होते. ते सर्वचे सर्व बाद झाले.


Back to top button
Don`t copy text!