
स्थैर्य, सातारा, दि. 24 : शहरालगत सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत अनेक अपार्टमेंट व बंगले आहेत. यातील अनेक बंगले, प्लॅटचे मूळ मालक हे पुण्या मुंबईत वास्तव्यास आहेत. शाहूपुरी ग्रामपंचायतीने करोनाचा पायबंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्य घेऊन विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये नवीन भाडेकरू कोठे आला तर त्यास नो एण्ट्री आहे. तसेच जो कोणी बाहेरून रहायला येणार आहे त्यास रेशनकार्ड, आधारकार्ड किंवा आई-वडिलांच्या नावाचा आठ अ चा उतारा असेल तर तेही अगोदर बाहेर कोरोनटाइन होऊन मगच प्रवेश देण्याची सक्ती केली आहे.
शहरालगत असलेल्या मोठया ग्रामपंचायतीचा मान शाहूपुरीला आहे. या ग्रामपंचायत हद्दीत अनेक अपार्टमेंट, बंगले आहेत. त्यातील काही मूळ मालक हे पुणे, मुंबई येथे राहत असतात. त्यामुळे कित्येक प्लॅट, बंगले पडून आहेत. करोनाच्या काळात कोरोनटाइन होण्यासाठी अलीकडे हे मूळ मालक सलग तीन महिन्याचे भाडे घेऊन 14 दिवस प्लॅट, बंगला भाडय़ाने देत असल्याचे जेव्हा ग्रामपंचायत प्रशासनास माहिती मिळाली तेव्हा हा प्रकार चुकीचा आहे. अगोदरच करोनाचा कलंक नको म्हणून ग्रामपंचायत प्रशासन काळजी घेत आहे. त्यावर उपाय म्हणून सरपंच, उपसरपंच यांनी गावात रिक्षाद्वारे नागरिकांना जाहीर आवाहन केले जात आहे. भाडयाने देण्यापूर्वी आधारकार्ड, रेशन कार्ड किंवा आपल्या आई-वडिलांच्या नावाच्या आठ अ चा उतारा असणे आवश्यक आहे. जरी बाहेरून येणाऱ्याकडे ती कागदपत्रे असली तरी त्यांना काळजी म्हणून कोरोनटाइन राहन्याची सक्ती केली जाते.
शाहूपुरी ग्रामपंचायत कार्यलयाकडून गावात नव्याने येणाऱ्यांना कोरोनटाइन करण्यासाठी टीसीपीसी भवनात सोय करण्यात आली आहे. प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर यांच्या सहकार्याने ही सुविधा करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची काळजी म्हणून त्यांना सॅनिटायझर, मास्क मोफत देण्यात आले आहेत, अशी माहिती पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शाहूपुरी ग्रामपंचायतीच्यावतीने सार्वजनिक ठिकाणी कोणी आढळून आले तर जाग्यावर दंड केला जातो. मग तो कोणी ही असेल तरीही.कारवाई करून दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती सरपंच गणेश आरडे यांनी दिली.