स्थैर्य, सातारा, दि.२८: सातारा शहरातील आझादनगर गंगासागर कॉलनीमध्ये शाहुपुरी पोलीसांनी छापा टाकून दारूची चोरटी विक्री करणाऱ्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 5,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि.26/05/2021 रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री संजय पतंगे यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की सातारा शहरातील आझादनगर गंगासागर कॉलनी मध्ये एक इसम त्याच्या घराच्या आडोशाला देशी विदेशी दारूच्या क्वार्टर चा माल स्वतःच्या कब्ज्यात बाळगून त्याची बेकायदा चोरटी विक्री करीत आहे अशी खबर मिळाली. सदर प्राप्त बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी छापा कारवाईसाठी पोलिस ठाण्याचे पथक तयार करून त्यांना छापा कारवाई बाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे सदर पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक सचिन माने, महिला पो.ना. वैशाली लोखंडे, पो.कॉ. ओंकार यादव, पंकज मोहिते, धीरज बेसके यांनी सदर बाबत माहिती प्राप्त करून मिळाले बातमीच्या ठिकाणी अचानकपणे छापा टाकून संशयित इसमास एका खाकी पुठ्ठ्याचे बॉक्स सह ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॉक्स ची तपासणी केली असता त्यामध्ये मॅकडोवेल्ल व्हिस्की, इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की, देशी दारू मनोरंजन संत्रा अशा 5,300/-रु. किंमतीच्या 44 देशी विदेशी मद्याच्या बाटल्या मिळून आल्या. सदर इसमाने बेकायदा बिगर परवाना स्वतःचे कब्जात सदरचा माल बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचा माल पो.हे.का. हसन तडवी यांनी जप्त करून सदर इसमाविरुद्ध पो.ना. सचिन माने यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक सचिन माने, महिला पो.ना. वैशाली लोखंडे, पो.कॉ. ओंकार यादव, पंकज मोहिते, धीरज बेसके या पथकाने केली आहे.