दोघांना अटक, 85 हजारांचा मुद्देमाल जप्त
स्थैर्य, सातारा, दि. 11 : येथील राधिका रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये चालणार्या बेकायदा ऑनलाईन लॉटरी सेंटरवर शाहूपुरी पालिसांनी छापा मारून व्हिडिओ गेम चालवणार्या सेंटरच्या मालक आणि कामगारास अटक केली असून 85 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. उमेश जगन्नाथ मस्के राहणार रविवार पेठ सातारा (कामगार) तर विनोद दशरथ कांबळे राहणार रविवार पेठ सातारा (मालक) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहित अशी, सहा. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायावर कारवाई करण्याच्या सूचना सपोनि विशाल वायकर यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सपोनि वायकर यांनी एक पथक तयार केले होते. दि.10 रोजी सपोनि वायकर यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, सातारा शहरातील राधिका रोडवरील पंचशिल अपार्टमेंटच्या बेसमेंटमधील पश्चिमेकडील गाळा क्र.2 मध्ये एक इसम हा कामगारामार्फत ऑनलाईन लॉटरी सेंटरमध्ये बेकायदेशिरपणे चालवत आहे. याठिकाणी ऑनलाईन आकडे लावून लोकांचेकडुन पैसे स्विकारुन ऑनलाईन लॉटरी जुगार चालवत असल्याचे समजताच सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक घेवून सपोनि वायकर यांनी त्याठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी त्यांना एकजण बेकायदेशीरपणे एस. एल. कुपन ऑनलाईन लॉटरी नावाचा जुगार चालवित असल्याचे आढळले. त्याची चौकशी केली असता हे लॉटरी सेंटर व व्हिडीओ गेम हे त्याने मालकाचे सांगण्यावरून चालवत असल्याचे सांगितले. शाहुपुरी पोलीसांनी छापा टाकुन रोख रक्कम, कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर मशिन, मोबाईल हॅन्डसेट, व्हिडीओ गेम मशीन असा एकुण 85 हजार 180 रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.
पो.नाईक अमीत माने यांच्या फिर्यादीवरुन लॉटरी सेंटर चालकाविरुद्ध व मालकाविरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई मा.सहा.पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदिप शितोळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, पो. ना. लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, पो. कॉ. ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, तुषार पांढरपट्टे यांनी केली आहे.