स्थैर्य, सातारा, दि.१९: महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक राजस्थान व इतर राज्यात सक्रिय असलेल्या तसेच एटीएममधून बँकांच्या पैशावर डल्ला मारून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार व त्याच्या साथीदाराला हरियाणा येथून शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या कामगिरीमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे फटाक्यांची आतषबाजी आणि हार घालून जंगी स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्रासह परराज्यातही एटीएममधून रोकड लांबवणारी टोळी सक्रिय होती. या टोळीने साताऱ्यातही अनेक ठिकाणी चोरी केल्याचे सीसीटीव्हीमध्ये निष्पन्न झाले होते. त्याआधारे पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर संबंधित आरोपी हरियाणामध्ये असल्याचे समोर आले. शाहुपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे कर्मचारी आणि अधिकारी काही दिवसांपूर्वी हरियाणाला रवाना झाले. परराज्यात थरारकपणे स्वतःचा जीव धोक्यात घालून शाहूपुरी पोलिसांनी टोळीतील मुख्य सूत्रधार व त्याच्या साथीदारालाही पकडले. राज्यभरातील अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या टोळीतील मुख्यसूत्रधारला घेऊन पोलीस साताऱ्यात आले. या कारवाईमुळे सातारा पोलिसांच्या लौकिकात आणखीनच भर पडली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पुणे प्रकटीकरणची ही टीम शनिवारी रात्री साताऱ्यात दाखल झाली. त्यावेळी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा गळ्यात हार घालून त्यांचे स्वागत करण्यात येत होते. हा अनोखा सोहळा अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. रात्री उशिरापर्यंत संबंधित दोन आरोपींकडे पोलीस कसून चौकशी करत होते. यासंदर्भात अधिकृत माहिती पोलीस अधीक्षक विजयकुमार बंसल हे सोमवारी देणार आहेत.