शाहू-आंबेडकर क्रांतीमुळे युवकांचे विविध क्षेत्रात यश – प्रबुद्ध सिद्धार्थ


दैनिक स्थैर्य । 27 जून 2025 । फलटण । शिक्षण, स्पर्धा परीक्षा, उद्योग व्यवसाय यामध्ये युवक यश मिळवत आहेत. हीच शाहू-आंबेडकरी क्रांती आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्ध सिद्धार्थ यांनी केले. ते राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित यशस्वी युवकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते.

सिद्धार्थ म्हणाले, समता स्थापन्यासाठी शाहू महाराजांनी संधी दिली. ही संधीची समानता बाबासाहेबांनी संविधानात समाविष्ट केली. यामुळेच आपले युवक आज विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक यश संपादन करत आहेत. हीच खरी शाहू-आंबेडकरी क्रांती आहे. शिक्षण, स्पर्धा परीक्षा, उद्योग व्यवसाय यातूनच आंबेडकरी आर्थिक क्रांती शक्य आहे. संविधानाने दिलेल्या संधीच्या स्वातंत्र्याचा आपण पूर्ण ताकतीने वापर केला पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळ मागील तीन दशकांपासून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कार्यरत आहे. प्रबुद्ध विद्याभवनच्या माध्यमातून मंडळ मोफत प्राथमिक शिक्षण देत आहे. मंडळातर्फे 10 वी, 12 वी, पदवीधर, आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा नियमितपणे गौरव केला जात आहे. या कार्यक्रमात अनेक यशस्वी युवकांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते या युवकांना सन्मानित करण्यात आले.

अमेरिकेतून वैमानिक प्रशिक्षण घेतलेल्या संकेत अहिवळे यांचा सत्कार माजी नगरसेवक मधुकर काकडे यांच्या हस्ते झाला. आयआयटी वाराणसीचा पदवीधर पराग लोंढे यांचा सत्कार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. खासगी बँक संस्थापक दयानंद पडकर यांचा सत्कार विजय येवले यांच्या हस्ते झाला. प्राणी वैद्यकीयशास्त्रातून पदव्युत्तर पदवी घेतलेल्या डॉ. अंकिता भोसले यांचा सत्कार संघमित्रा अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला. उद्योगविश्वात कार्यरत संघराज दिपाली अहिवळे यांचा सत्कार जे.एस. काकडे यांच्या हस्ते झाला. पेट्रोलपंप व्यावसायिक दादासो गायकवाड यांचा सत्कार सचिन अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला. महावीर मोहिते यांचा सत्कार आर.डी. काळे यांच्या हस्ते झाला. लेबर सप्लाय एजन्सीच्या माध्यमातून कार्यरत वैशालीताई कांबळे यांचा सत्कार अंजलीताई अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यसेवेत निवड झालेल्या शंकेश्वर अहिवळे यांचा सत्कार नानासो मोहिते यांच्या हस्ते झाला. इस्रोमध्ये निवड झालेल्या सुमेध आढाव यांचा सत्कार प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात झाला.


Back to top button
Don`t copy text!