शाहीर कृष्णराव साबळे यांची जन्मशताब्दी थाटात साजरी होणार — प्रधान सचिव विकास खारगे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । शाहीर कृष्णराव साबळे यांची जन्मशताब्दी थाटात साजरी करण्यात येणार असून त्यासंदर्भात शाहीर कृष्णराव साबळे जन्मशताब्दी समितीची बैठक सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडली.

या बैठकीस काही अशासकीय सदस्य दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त घ्यावयाच्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात राज्यभरात विकेंद्रीत पद्धतीने विविध कार्यक्रम आयोजित करणे, शाहीरांचे पोवाडे व लोकगीतांचे कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करणे याचबरोबर शाहीर साबळेंच्या चरित्रावर आधारित पुस्तक प्रकाशित करणे, शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित करणे, शाहीर साबळे यांच्या नावाने विद्यापीठात अध्यासन तयार करणे, इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. खारगे म्हणाले की, नुकतेच राज्याने “जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा”हे राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात आले असून हे गीत शाहीर साबळे यांनी म्हटले आहे. हे गीत त्यांनी इतके लोकप्रिय केले होते की अनेकांना ते आधीच राज्यगीत आहे असे वाटत होते. आजच्या बैठकीत प्रत्येक सदस्याने केलेल्या सूचनांची दखल शासनाने घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा या उपक्रमांना भक्कम पाठिंबा आहे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केलेले सादरीकरण तसेच बैठकीत मांडण्यात आलेले मुद्दे याचा एकत्रित कालबद्ध आराखडा तयार करुन राज्य शासनाची मंजूरी घेण्यात येईल.

शाहीर साबळे जन्मशताब्दी समितीतील प्रत्येक सदस्याने एकाहून अधिक उपक्रमाची जबाबदारी घेतली, याबद्दल श्री.खारगे यांनी आनंद व्यक्त केला. जन्मशताब्दीनिमित्त शाहीर साबळे यांच्यावर चरित्रग्रंथ लेखनाची जबाबदारी प्रकाश खांडगे यांच्याकडे देण्यात आली आहे. या चरित्रग्रंथासाठी शासन पूर्ण सहाय्य करेल असे श्री खारगे यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सहसंचालक श्रीराम पांडे, प्रकाश खांडगे, अंबादास तावरे, कैलास म्हापदी हे प्रत्यक्ष आणि केदार शिंदे, भरत जाधव, नंदेश उपम, अंकुश चौधरी आणि चारुशीला साबळे वाच्छानी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!