वेरुळ येथील शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगिण विकास करणार – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी व पर्यटनाला चालना मिळण्यासाठी निधी मिळवून देण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. वेरुळ येथे शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगिण विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वेरुळ येथे शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीच्या नूतनीकरण शुभारंभ प्रसंगी डॉ.कराड बोलत होते.

कार्यक्रमास माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कराड, वेरुळचे सरपंच प्रकाश पाटील, अभिजित देशमुख, अनिल मानकापे, किशोर चव्हाण आदी उपस्थित होते.

डॉ.कराड म्हणाले की, औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे. या शहराला राज्य शासनाने पर्यटनाची राजधानी असे संबोधले आहे. जगप्रसिद्ध वेरुळ, अजिंठा लेण्यांमुळे पर्यटक आकर्षित होतात. त्यादृष्टीने पर्यटन वाढीसाठी तसेच पर्यटकांना सोईसुविधा तसेच या परिसराच्या सर्वागीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहाजीराजे स्मारक व मालोजीराजे गढीच्या सर्वांगिण विकासासाठी सीएसआरमधून ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. विकासासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय  पातळीवर साजेसे काम होणार आहे. यामध्ये नाईट टुरिझम, आकर्षक वीज रोषणाई व पर्यटक आकर्षित होतील असा विकास करण्यात येईल. गढीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही डॉ. कराड म्हणाले.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांची जपणूक, संवर्धन, सौंदर्यीकरण करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून अनेक कामांना निधी मिळवून देण्याबाबत आपला पाठपुरावा सुरू असुन लवकरच ही कामे गती घेतील, असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.

शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कराड यांनी शिवजयंती उत्सवाबाबत माहिती दिली. शिवजयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा व महिलांसाठी दीपोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा,असे आवाहन त्यांनी केले. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी युवक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!