शिक्षक आमदारकीसाठी डीएड शिक्षक संघटनेने ठोकला शड्डू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मायणी, दि.३: शिक्षक आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीस जोरदार सुरुवात केली असून, यंदा प्रथमच डीएड शिक्षक संघटनेने सवता सुभा मांडत शड्डू ठोकला आहे. कोरोनामुळे व्हॉट्‌सऍप, फेसबुक, मेसेज, व्हिडिओ कॉन्फरन्स आदी माध्यमांद्वारे मतदारांशी संपर्क साधला जात आहे.

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाल जुलैअखेर संपुष्टात आला. कोरोनामुळे सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचनाही लांबणीवर पडली होती. मात्र, आयोगाने नुकतीच निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली. त्यानुसार एक डिसेंबरला मतदान होणार आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विस्ताराने मोठा असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोचणे शक्‍य नसते. त्यामुळे अनेक उमेदवार शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षण संस्थाचालक यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रचारासाठी शिक्षक कार्यकर्ते प्रत्येक शाळेपर्यंत पोचत असत.

राज्यातील 43 हजार शिक्षकांचा निर्धार; अगोदर अनुदान, मगच मतदान 

यंदा कोरोनामुळे शाळा बंद असून, अत्यावश्‍यक काम असेल, तरच शिक्षक शाळेत येत आहेत. परिणामी शिक्षकांशी थेट संपर्क साधणे, गाठीभेटी घेणे अशक्‍य होत आहे. म्हणूनच व्हॉट्‌सऍप, फेसबुक, टेक्‍स्ट मेसेज, व्हिडिओ कॉन्फरन्स आदी माध्यमांद्वारे मतदारांशी संपर्क साधण्याचे आव्हान उमेदवारांना पेलावे लागत आहे. मतदार नोंदणीसाठी प्रयत्नांची शिकस्त करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार दत्तात्रय सावंत यांनी मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा विविध घटकांना तालुकास्तरावर आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे शिक्षक आमदारकीची निवडणूक चर्चेत येऊ लागली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!