
थेट WhatsApp वर मिळवा
ग्रामीण भागातील महिला व स्वयंरोजगार इच्छुकांसाठी शिलाई मशीन खरेदीवर १०० टक्के आणि पीठ गिरणीसाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देणाऱ्या योजनांची माहिती समोर आली आहे.
स्थैर्य,सातारा, दि. 29 नोव्हेंबर : राज्यातील विविध जिल्हा परिषदा व समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला, बेरोजगार व पात्र घटकांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी यासाठी शिलाई मशीन आणि पीठ गिरणीसाठी अनुदान दिले जाते. याअंतर्गत शिलाई मशीनसाठी १०० टक्क्यांपर्यंत तर पीठ गिरणीसाठी ९० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्याची तरतूद विविध योजनांमध्ये करण्यात आली आहे.
अनुदान योजना व पात्रता निकष
जिल्हा परिषदेच्या सेस फंड तसेच समाजकल्याण व दिव्यांग कल्याण योजनांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, विधवा, परितक्त्या व दिव्यांग घटकांना प्राधान्य दिले जाते. संबंधित जिल्ह्याच्या निकषांनुसार उत्पन्न मर्यादा, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र आणि आवश्यक असल्यास प्रशिक्षण प्रमाणपत्र या अटी लागू राहतात.
अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे
इच्छुक अर्जदारांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून अथवा संबंधित ऑनलाईन प्रणालीवरून विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक असते. अर्जासोबत आधार कार्ड, बँक पासबुक प्रत, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि आवश्यक इतर कागदपत्रे जोडून अर्जाची पोचपावती घ्यावी.



