दैनिक स्थैर्य । दि. 13 डिसेंबर 2021 । फलटण । फलटण ब्लड बँकेमध्ये सर्व रक्तगटाच्यी रक्तांची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. तरी रक्तदात्यांनी फलटणकर बँकेशी संपर्क साधून सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये जास्तीत जास्त रक्तदान करावे, असे आवाहन फलटण ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ. बिपीन शहा यांनी केलेले आहे.
कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसर्या लाटेदरम्यान फलटणमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झालेला आहे. लसीकरणानंतर रक्तदान करण्यासाठी असलेले काही दिवसांचे निर्बंध, कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, लॉकडाऊन अशा विविध कारणांमुळे रक्तदात्यांचा ओघ कमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन फलटण बल्ड बॅंकेचे अध्यक्ष डॉ. बिपीन शहा यांनी केलेली आहे.
कोरोना संसर्गाच्या काळामध्ये रक्तदान मोहिमेला मोठ्या प्रमाणात खीळ लागली. आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात काम करणारे कार्यकर्ते, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या आरोग्यदूतांनी आवाहन केल्यानंतर रक्तदान मोहीम सुरळीत झाली होती. मात्र आता पुन्हा रक्ताचा तुटवडा फलटणमध्ये जाणवू लागलेला आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन फलटण ब्लड बॅंकेकडून करण्यात आलेले आहे.
कोरोनाबाधित नसलेल्या रुग्णांवरील प्रलंबित शस्त्रक्रिया आता सुरू झाल्या आहेत. प्रसूती, अपघात, प्रलंबित शस्त्रक्रियांसाठी रक्ताची तातडीची निकड भासू शकते त्यामुळे या रक्ताच्या उपलब्धतेसाठी दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन सुध्दा डॉ. बिपीन शहा यांनी केले आहे.