
स्थैर्य, दि.४: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतीच गाजीपूर सीमेवर जाऊन शेतकरी आंदोलकांची भेट घेतली होती. आता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज गाजीपूस सीमेवर गेल्या आहेत. यावेळी सुप्रिया सुळेंसोबत इतर खासदार देखील आहेत. दरम्यान त्यांना गाजीपूर सीमेवर अडवले आहे. आंदोलनस्थळावर जाण्यापासून त्यांना मज्जाव करण्यात आला आहे.
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आढावा घेेण्यासाठी गेले आहेत. मात्र, या सर्वांना दिल्ली पोलिसांनी या सीमेवरच अडवण्यात आले आहे.
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासोबत अनेक खासदार आहेत. या खासदारांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, केरळमधील अनेक खासदारांचा समावेश आहे. विविध राज्यातील दहा पक्षांचे खासदार यासाठी एकत्र आले आहेत. सर्व खासदार मिळून पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत.
सीमेवर जाण्याविषयी काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे…
याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘मी शेतकऱ्याची लेक आहे. केंद्र सरकार ज्या पध्दतीने शेतकऱ्यांची वागत आहे. ते पाहून दुःख होत आहे. तसेच मराठीत एक म्हण आहे की, अन्नदाता सुखी भवः… मात्र आज अन्नदाता हा आंदोलन करत असताना दिसतोय. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, त्यांनी लवकर शेतकऱ्यांची चर्चा करुन त्यांना न्याय द्यावा. तसेच शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे. मी आज गाजीपूरला जाऊन शेतकरी आंदोलकांशी चर्चा करणार’ असे सुळेंनी स्पष्ट केले. एएनआय या न्यूज एजेंसीला त्यांनी ही माहिती दिली.