स्थैर्य, फलटण दि.26 : सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे रान पेटले आहे. ‘राजकारणाच्या दृष्टीने लोकसभा – विधानसभा निवडणूकीपेक्षा ग्रामपंचायत निवडणूक खूप अवघड’ असे अनेकदा बोलले जाते. कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला आणि गावागावातल्या राजकारणाला गती आली. त्यातच निवडणूक आयोगाने सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निवडणूकीनंतर ठेवल्याने सरपंचपदावर डोळा असणार्या उमेदवारांची चांगलीच कुचंबना झाली. त्यातच भर म्हणून निवडणूक आयोगाने सरपंचपदासाठी सातवी पासची अट घालून अनेक अंगठेबहाद्दरांचे सरपंचपदाचे मनसुबे बारगळले आहेत.
निवडणूक आयोगाने आधी सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निवडणूकीनंतर ठेवण्यात आली आणि आता सरपंचपदासाठी सातवी पासची अट घातली त्यामुळे सध्यातरी उमेदवारांचा सरपंचपदाबाबतचा उत्साह कमी झाला आहे. मात्र, गावकारभार पाहण्यासाठी यानिमित्ताने किमान सुशिक्षित कारभारी गावाला लाभणार असल्याने, मतदारवर्गातून आयोगाच्या या आदेशाचे स्वागतच होत आहे.