मंदिराच्या विहिरीचा गाळ काढताना आढळली सतराव्या शतकातील कट्यार आणि खंजीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । सातारा । येथील महागणपती मंदिर परिसरातील काशिविश्वेश्वर मंदिराच्या विहिरीचा गाळ काढताना सतराव्या शतकातील कट्यार व खंजीर ही हत्यारे आढळून आली. ही हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतले असून लवकरच पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

येथील महागणपती मंदिरालगतच्या काशीविश्वेश्वर मंदिर परिसरात फरसबंदी घाटावर पुरातन आड वजा विहीर आहे. त्यात नियमित पूर्वापार मोठा पाणी साठा असतो. या आडातील पाण्याचा अनेक वर्षात उपसा बंद असल्याने व देखभालीअभावी पाण्याला दुर्गंधी येत होती. या मंदिराचे ट्रस्टी शैलेंद्र गोखले यांनी आडाची स्वच्छता करण्याच्या हेतूने गाळ काढण्यास मागील पंधरा दिवसांपासून सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि १८)गाळ काढत असताना काळामध्ये सात कट्यार आणि एक खंजीर आढळून आला. याबाबतची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना गोखले यांनी कळवली. त्यांनी तात्काळ मंदिर परिसरात भेट देऊन पंचनामा करून हत्यारे ताब्यात घेतली.याबाबत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, तहसीलदार रणजीत भोसले व सातारा येथील शिवाजी महाराज संग्रहाला कळविण्यात आले. याबाबत शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांना विचारले असता त्यांनी या बाबत माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. ही हत्यारे छायाचित्र पाहून सतराव्या शतकातील असावीत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. लवकरच ही हत्यारे संग्रहालयाच्या ताब्यात घेण्यात येतील असे सांगितले.


Back to top button
Don`t copy text!