
स्थैर्य, सातारा, दि.२१: भवानी पेठेतील युनियन क्लब लगतच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज भाजी मंडईत तब्बल सात भाजी विक्रेते पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पालिकेने सतर्कतेचा भाग म्हणून ही भाजी मंडई बंद केली आहे.
सातारा पालिकेच्या शहर विकास विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये अत्यावश्यक सेवा देणार्या सर्वांनाच करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. येथील राजीव गांधी मल्टिपर्पज हॉलमध्ये व्यापारी फळ व भाजी विक्रेते अशा 345 जणांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये चौपाटीवरील चार विक्रेते पॉझिटिव्ह आले होते. चौपाटीनंतर राजवाडा भाजी मंडईतील सात भाजी विक्रेते अशाच चाचणीनंतर करोना संक्रमित आढळल्याने भाजी विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राजवाडा भाजी मंडईमध्ये कायमच ग्राहकांची भाजी खरेदीसाठी गर्दी असते. मात्र, मंडईच्या दोन कट्ट्यांमध्ये तीन फुटांचे अंतर असले तरी नागरिकांच्या होणार्या गर्दीमुळे येथे सामाईक अंतर राखले जात नसल्याची परिस्थिती आहे.
मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी तत्काळ मंडई करण्याचे आदेश देऊन सर्वच भाजी विक्रेत्यांची तपासणी करण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. सातारा पालिकेचे कोविड कक्ष प्रमुख प्रणव पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या अहवालाची नोंद घेण्यात आल्याचे सांगितले. या भागाला कंटेन्मेंट झोन तयार करण्याची कार्यवाही प्रांतांच्या आदेशाप्रमाणे करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले. मुख्याधिकारी बापट यांनी आरोग्य विभागाला तत्काळ सूचना करून भाजी मंडईचा परिसर संपूर्ण निर्जंतुक करण्याचे आदेश दिले आहेत. भाजी मंडईत खरेदी निमित्त आलेल्या नागरिकांनीसुद्धा तत्काळ करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.