
स्थैर्य, फलटण, दि. ०९: वैद्यकीय क्षेत्र आणि मनुष्य यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे. या क्षेत्राने आजवर केलेली प्रगती मानवजातीसाठी ‘तारक’च ठरलेली आहे. यातून माणसाचे आरोग्यदायी जीवनमान वाढले असून या क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने आजही अनेक हात कार्यरत आहेत. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ या संत उक्तीप्रमाणे ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून समाजातील शेवटच्या घटकासाठी विद्वत्तेच्या जोरावर आपली हयात घालवणारे अनेक जण या क्षेत्रात प्रामाणिकपणे कष्ट घेत आहेत.
सध्या ‘कोरोना’च्या रुपाने जगभर आरोग्यविषयक आणीबाणी निर्माण झाली आहे. या भिषण परिस्थितीचा सामना करण्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र सर्वात आघाडीवर लढत आहे. यामध्ये शासकीय व खाजगी यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यांची भूमिका तर महत्त्वाची आहेच पण त्याचबरोबर औषधनिर्माण शास्त्रातील संशोधक, औषध निर्मात्या कंपन्या, त्यांचे पुरवठादार हे देखील ठोस भूमिका पार पाडत आहेत. हे निश्चितच अभिमानास्पद आहे मात्र; जीवघेण्या ‘काळा’चा फायदा घेवून या क्षेत्राशी निगडीत काही घटक ‘आर्थिक’ हिताला प्राधान्य देत ‘स्वहित’ जोपासत आहेत.
कोरोना रुग्णांना जीवनदायी ठरणार्या रेमडीसीवर इंजेक्शनचा काळा बाजार संपूर्ण देश उघड्या डोळ्याने अनुभवत आहे. देशातील मंदावलेल्या कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊन रेमडीसीवर, ऑक्सीजन आदींची मागणी झपाट्याने वाढली. ‘मागणी वाढली की वस्तूंचा तुटवडा जाणवतो आणि किंमतीत नफेखोरीच्या उद्देशाने वाढ होते’, हा व्यापार क्षेत्रातील नियम आहे. मात्र; तो आरोग्यक्षेत्रात; जिथे माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा आहे तिथे अनुभवास येणे फारच दुर्दैवी म्हणावे लागेल. ‘अव्वाच्या सव्वा किंमतीला इंजेक्शन्सची विक्री’, ‘बनावट इंजेक्शन्स’ अशा गैरव्यवहारात अटक झालेल्या टोळ्या प्रत्यक्षात जरी वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत नसल्या तरी या ना त्या माध्यमातून या क्षेत्रातील अपप्रवृत्ती छुप्या पद्धतीने किमान साठेबाजीच्या रुपाने का होईना त्यांच्या पाठीशी असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काही ठिकाणी तर काळ्या बाजारातून ही इंजेक्शन्स खरेदी करण्याचा मार्ग डॉक्टरच दाखवत असल्याचे आरोपही पुढे आले आहेत. हे आरोप कितपत खरे, कितपत खोटे हा वेगळा विषय असला तरी शासनाने निर्देशित केलेल्या कोरोना चाचणींचे दर, उपचाराचे दर आदींचे राज्यातील किती खाजगी रुग्णालये पालन करतात? याचा शोध घेतल्यास अनेकांचे ‘उद्देश’ स्पष्ट होतील. वैद्यकीय क्षेत्रातील या अनैतिकतेचा धोका येत्या काळात लसीकरणाच्या बाबतीतही नाकारता येत नाही. कारण, आजमितीस लस वितरणाबाबतचे सरकारचे धोरण येत्या काळात ‘फेल’ जाते की काय असे चित्र आहे. 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सरकारने सुरु केले असले तरी त्या प्रमाणात लसींची उपलब्धता होत नसल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी – गोंधळ होत आहे. शिवाय 45 वर्षे व त्यापूढील वयोगटातील नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देय तारखेमध्ये मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी सरकारी केंद्रांसह खाजगी रुग्णालयातील लसीकरण लसींअभावी बंद आहे. त्यामुळे या अनियंत्रित परिस्थितीचा फायदा घेवून रेमडीसीवर प्रमाणे लसींबाबतही काळा बाजार घडण्याची शक्यता दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने याबाबतीत तरी दक्ष राहणे अपेक्षित आहे.
शेवटचा मुद्दा :
वास्तविक पाहता पूर्वीपेक्षा आज समाजात अमूलाग्र बदल झालेला आहे. समाजातील व्यक्तीची ‘पत’ ही त्याच्या ज्ञानावर वा कौशल्यावर अवलंबून नसून ती त्याच्याकडे असणार्या ‘पैशावर’ ठरु लागल्याने कोणत्याही पेशामध्ये ‘पैसे कमावणे’ हाच सर्वोच्च हेतू मानला जात आहे. त्यातूनच आपल्या पेशाचा मूळ हेतू ‘सेवा’ हा असल्याचा विसर पडून त्याचे रुपांतर ‘व्यवसाया’त होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आर्थिक आव्हाने मोठी असल्याने ही आव्हाने पेलताना याही सेवाभावी क्षेत्राचे व्यवसायात रुपांतर होणे टाळता येणे अजिबात शक्य नाही. हे जरी खरे असले तरी, माणसांच्या जीवावर उठलेल्या कोरोनारुपी राक्षसाशी सामना करताना ज्यांना ‘देवदूतां’चा दर्जा दिला जात आहे त्यांच्याकडून किमान प्रामाणिक वागणूक व सेवाभावी वृत्ती यावरच या क्षेत्राची इथून पुढील विश्वासार्हता अवलंबून आहे.
– रोहित वाकडे,
संपादक, साप्ताहिक लोकजागर, फलटण.