फलटणमध्ये जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारा; उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आदेश; पाच दिवसांत ई – टेंडर काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २९ : फलटण, माण व खटाव तालुक्यात कोरोना उपचारासाठी फलटण येथे जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यासाठी आदेश देण्याबरोबरच पाच दिवसात ई-टेंडर काढण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले आहेत. तसेच फलटण जम्बो कोव्हीड हॉस्पिटलसाठी पाठपुरावा करावा व मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामात प्रगती दिसायला हवी तसे दिसून न आल्यास कामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा हि उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी दिला आहे. या आदेशानंतर लगेचच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी फलटण येथील जम्बो कोव्हीड हॉस्पिटलच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली व जम्बो कोव्हीड हॉस्पिटल लवकरात लवकर उभे राहण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी दिल्या.

सातारा जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर ना. अजितदादा पवार यांनी सातारा येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना फलटण येथे जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यासाठी आदेश दिलेला होता. त्या नंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी फलटण येथील जम्बो कोव्हीड हॉस्पिटलच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली. या वेळी आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांच्यासह फलटण मधील प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

फलटण शहरासह तालुक्यातील कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी फलटणमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असं जम्बो रुग्णालय फलटणमध्ये उभारण्यात येणार आहे. येथे कोरोना बाधित रुग्णांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध राहणार आहेत. कोविड रुग्णांसाठी मोठ्या शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्यासाठी जम्बो हॉस्पिटलची स्थापना या पूर्वीच करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने फलटण येथे जम्बो हॉस्पीटल स्थापन करण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. फलटण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी जम्बो हॉस्पिटलची स्थापना वखार महामंडळाच्या गोदामामध्ये करण्यात येणार आहे. त्या बाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला होता. तोच प्रस्ताव उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी मंजूर केला असून फलटण येथे तातडीने जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारण्याचे आदेश दिलेले आहेत.

सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांच्या जास्त रुग्ण संखेमुळे फलटण तालुका हॉटस्पॉट ठरला आहे, विशेष करुन ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाने मोठ्या प्रमाणात हात पाय पसरले आहेत. आजमितीस फलटण तालुक्यात २३ हजारांपेक्षाही जास्त रुग्ण कोरोनाबाधित आहेत. फलटण तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने तालुक्यात सर्वत्र भितीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे. फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत मोठ्या तक्रारी आहेत. तर खाजगी रुग्णालयातील बिलांचे आकडे अनेक सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. अशा परिस्थितीत जम्बो कोव्हीड हॉस्पिटल जनतेसाठी निश्चितपणे वरदान ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!