
स्थैर्य, सातारा, दि. २१ सप्टेंबर : सैन्य दलात भरती करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका कार्यरत लष्करी जवानाला अटक करण्यात सातारा तालुका पोलीस स्टेशनला यश आले आहे. प्रदीप विठ्ठल काळे (वय २८, रा. कोळे, ता. कऱ्हाड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो सध्या पठाणकोट येथे कार्यरत आहे.
सातारा तालुका पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेडगाव (ता. सातारा) येथील फिर्यादी रितेश नितीन जाधव यांनी १९ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. आरोपी प्रदीप काळे याने फिर्यादीच्या भावाला सैन्य दलात भरती करतो, असे सांगून त्यांच्याकडून ३ लाख ७० हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने घेतले होते. पैसे स्वीकारल्यानंतर आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपी प्रदीप काळे हा सुट्टीवर आपल्या गावी आल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी कोळे (ता. कऱ्हाड) येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी तरुणांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पथकाने केली.