
दैनिक स्थैर्य । 29 एप्रिल 2025। सातारा। महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 विविध विभागांकडून नागरिकांना 1 हजार 27 सेवा दिल्या जात आहेत. महसूल विभागाकडून 32 सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत. ह्या सेवा दिलेल्या मुदतीत द्याव्यात, असे उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सेवा हक्क दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, प्रांताधिकारी राहुल बारकुल, तहसीलदार नागेश गायकवाड यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी उपस्थित होते.
विविध विभागामार्फत देण्यात येणार सर्व सेवा लवकरच ऑनलाईन करण्याचा शासनाचा माणस असल्याचे सांगून उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण म्हणाले, 10 वी व 12 वी चा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध दाखले काढण्यासाठी गर्दी करतात. परंतु पालकांनी निकाल लागायच्या अगोदर शिक्षणासाठी लागणारे दाखले काढून ठेवावेत. पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या महाविद्यालयात आपले सरकार केंद्र सुरु करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याचाही महाविद्यालयांनी विचार करावा. याची सुरुवात सातारा शहरापासून व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रांत कार्यालयाने विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कोणते दाखले लागतात, त्याच्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याबाबत शिबीराचे आयोजन करावे. लोकसेवा हमी अधिनियमांतर्गत देण्यात येणार्या कागदपत्रांवर क्युआर कोडचा वापर करावा. हा कोड मोबाईलवरुन स्कॅन केल्यानंतर त्याला सर्व माहिती मिळेल. ह्या क्युआर कोडचा महसूल विभागातील प्रत्येक शाखेने वापर करावा, अशा सूचनाही उपजिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी कार्यक्रमा प्रसंगी दिल्या.
जन्मापासून ते मृत्युपर्यंत नागरिकांचा शासकीय कार्यालयाशी संबंध येतो. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 हा 28 एप्रिल 2015 रोजी अस्तित्वात आला. या अंतर्गत येणार्या सेवा ह्या मुदतीत देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. प्रत्येक विभागाने आपल्या विभागाकडून कोणत्या सेवा दिल्या जात आहे, सेवा मुदतीत न दिल्यास दाद कोठे मागावी याचीही माहिती दिली पाहिजे, असे प्रास्ताविकात प्रांताधिकारी श्री. बारकुल यांनी सांगितले.
कार्यक्रमात स्व. यशवंतराव चव्हाण सोशल वर्क महाविद्यलायाने महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 यामध्ये असणार्या तरतुदींवर आधारित पथनाट्य सादर केले. या अनुषंगाने विविध महाविद्यालयांनी स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. तसेच यावेळी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सेवा हक्क दिना निमित्त उपस्थितांना शपथ दिली.