प्रवचने – विषय मनात आले की भगवंताची आठवण करावी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


‘भगवंता, माझा भोग बरा कर,’ असे आपण जर त्याला म्हटले नाही, तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल. भगवंताच्या स्मरणात आनंद आहे. आनंदाची जाणीव झाली की दुःखाची जाणीव कमी होईल. अनुसंधानाने जे काय साधायचे ते हेच. भगवंताचे अनुसंधान सोडू नये. घरादाराला रात्रीच्या वेळी आपण पहारा ठेवतो, चोर येतील त्या वेळेस सावध राहतो; तसेच संधीच्या वेळेस भगवंतापासून दूर होऊ नये म्हणजे झाले. वेळेला सावध राहणे ज्याला जमत नसेल त्याने अखंड सावधान राहावे. विषय मनात आले की तिथे भगवंताची आठवण ठेवून द्यावी. ‘अंते मतिः सा गतिः’ अशी आपल्यात एक म्हण आहे. जन्मात जे केले नाही ते मृत्युच्या वेळेला कसे आठवता येईल ? एवढ्याकरिता भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे. भगवंताचे नाम हे औषध समजावे; भगवंताची प्राप्ती हे त्याचे फल. औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे. नामस्मरण जर शेवटपर्यंत चालू राहिले तर तो ‘योगच’ आहे; आणि त्या ‘एकाशी’ योग साधणारा तो योगी समजावा.

एकच ठिणगी कापसाचा नाश करायला समर्थ असते, त्याप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते. आपण ते आवडीने, तळमळीने, भावाने घेत नाही, त्यात नामाचा काय दोष ? नामाची भावना वाढविणे हीच उपासना. एखाद्या आईला सांगितले की, ‘तू मुलाला जवळ ठेव पण त्याच्यावर प्रेम करू नकोस,’ तर ते जसे शक्य नाही, त्याप्रमाणे नाम घेणार्‍याला सत्कर्म टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही. एकवेळ भजनाला देहबुद्धीची झळ लागेल, पण नामाला ती नाही, हे लक्षात ठेवावे. मरणाच्या मागे स्मरणाचा ससेमिरा चालू ठेवावा, म्हणजे मरणाची भिती नाहीशी होईल. खरोखर, भगवंताच्या नामाची तळमळ मनापासून लागायला हवी. तेरा कोटी जपामध्ये अंतःकरणाची तळमळ ही जास्त उपयोगी पडते, यात शंकाच नाही. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण होऊ न देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे, यांतच खरे समाधान, शांति आणि सुख आहे. खरे सांगतो मी, मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे; आपण नामात राहावे आणि दुसर्‍याला नामात लावावे. संसारात न्यून पडू देऊ नये, पण भगवंताला विसरू नये, भगवंताच्या स्मरणात स्वतःस विसरावे. सर्वांभूती नम्र होणे हाच अभिमान घालविण्याचा उपाय होय. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे.

मायेने आपल्यावर विषयास्त्र सोडले की आपण त्यावर भगवंताच्या
नामाचे अस्त्र सोडावे, म्हणजे विषय आपोआप नाहीसा होईल.


Back to top button
Don`t copy text!