मुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नवस करून त्याला जगवायचा प्रयत्न करू लागतो; ‘जगला तर देवाला अर्पण करीन’ म्हणतो. अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार; मग तो आज मरण पावला तरी कुठे बिघडले? मुलगा जगावा असे वाटते ते आमच्या सुखाकरीताच. एक दिवस हा जाणारच हे ज्याला खरे पटले, तो नाही देवाजवळ असे मागणार. जन्ममरणाच्या फेर्यातून सुटावे हे मागून घेण्यापेक्षा, मरण चुकवावे हे म्हणणे किती वाईट आहे ! खरा भक्त तोच की ज्याला संताजवळ किंवा देवाजवळ काय मागावे हे बरोबर समजते. मरणाला जे कारण झाले ते चुकवावे. मरण येणार हे नक्की ठरलेलेच आहे; मग ते चांगले यावे असे नाही का वाटू ? ज्यानंतर पुन्हा जन्म नाही ते चांगले मरण. जो मरतो त्याचा आपण शोक करतो. ‘देव आज लोपला’ असे म्हणतो, ते आपल्या स्वार्थापोटीच. स्वतःला विसरणे, ‘मी कोण’ हे न जाणणे, हे मेल्याप्रमाणेच आहे. याकरिता, आलेली संधी वाया जाऊ देऊ नये. बुद्धी जोवर स्थिर आहे तोवर कार्य साधून घ्यावे. आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असे आपले चालले आहे. संकल्पविकल्पांनी आपण बेजार होतो. तेव्हा, ज्या वासनेत आपला जन्म होतो ती वासनाच भगवंताच्या नामाने मारून टाकावी. नामात राहणे म्हणजेच वासना मारणे, म्हणजेच मरणातीत होणे. भगवंताचे होऊन राहणे हाच मरण टाळण्याचा खरा उपाय आहे. काळाचाही जो काळ, त्याला ओळखल्यावर मरणाची भीती कसली ! ज्ञानी नाही मरणाची काळजी करीत. नुसते जिवंत राहणे हे काही खरे नव्हे. जगणे हे काहीतरी हेतूसाठी, ध्येयासाठी असावे. जगून भगवंताच्या अनुसंधानात राहावे. भाग्याचा दिवस तोच की ज्या दिवशी नामस्मरणामध्ये देहाचा अंत झाला.
वास्तविक, आम्ही दररोज जगतो आणि मरतो. एकदा निजला आणि पुन्हा जागा नाही झाला की तेच मरण ! झोप हे एक प्रकारचे मरणच आहे. एवढ्याकरिता, झोपी जाताना नामस्मरण करीत करीत झोपी जावे, म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जाग येईल. पण झोपेच्या वेळी नाम येण्यासाठी, त्याचा अगोदर अभ्यास करणे जरूर आहे. जागृतीत अभ्यास केला नाही, तर झोपेच्या वेळी दुसरेच विचार येतील. नामस्मरण बाजूलाच राहील, आणि भलत्याच विचारात पटकन झोप लागून जाईल. सदोदित नामस्मरण केले नाही तर ते अंतकाळी कसे येईल ? अभ्यास अगोदर केला नाही तर परिक्षेच्या वेळी तो कसा येईल ? तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासूनच सुरूवात करू या.