प्रवचने – नामाशिवाय कशानेही समाधान नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


मनुष्य चूक करतो, आणि ‘देवा, क्षमा कर’ म्हणतो; पण पुन्हा पुन्हा चुका करीतच रहातो. हे काही योग्य नव्हे. अशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही. ‘देवा, क्षमा कर’ हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे, की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही. तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता. अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही. बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल ? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ, असे म्हणणे कदापीही योग्य होणार नाही. तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही. ते तुम्ही करा.

समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणे वाचली, ग्रंथ मुखोद्‍गत केले, प्रवचने ऐकली, तरी मनाला समाधान लाभणार नाही. त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे. नामात राहिले पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्यभावाने शरण जाऊन, त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या.

एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता. वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले, ते बंद होते म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली. आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकर्‍याच्या मनात आले, ‘देवा, तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा; आणि हा लबाड व्यापारी, याला मात्र तू ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस. काय तुझा हा न्याय !’ एवढ्यात मोटारीचे दार उघडून दोन नोकरांनी त्या माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरविले. तो पांगळा होता ! वारकर्‍याने विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे. आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे, हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते. आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल, तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणू या. असे जर आपण केले तर दुःखाचा आवेग कमी होईल.

ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल.


Back to top button
Don`t copy text!