प्रवचने – परमेश्वर जाणण्याचा मार्ग !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जो कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो; स्वतः निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंशरूपाने असतो. न्यायाधीश निकाल देतो तेव्हा ‘अमक्या न्यायाधिशाने निकाल दिला’ असे म्हणतो. म्हणजेच काय की, तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच. त्याचप्रमाणे परमात्म्याने हे जे सर्व जग उत्पन्न केले, त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे. म्हणूनच, सर्व चराचरामध्ये ईश्वर पाहावा असे सांगतात त्याचेही कारण हेच आहे. या सर्व चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पाहायला आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते. देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते, पण ती बरोबर जाणली जात नाही, आणि ती बरोबर जाणण्याची इच्छा होणे हेच खरे व्हायला पाहिजे असे असते, अशी ज्याला इच्छा झाली त्याचे अर्धे काम झाले असे म्हणावे. तशी इच्छा झाल्यावर, देव पाहण्यासाठी काय मार्ग आहेत हे तो पाहू लागतो. त्याला पुष्कळ निरनिराळे मार्ग सांगणारे भेटतील. कोणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल; कुणी सांगतील की ब्रह्मचारी राहिले म्हणजे देव भेटेल, कुणी सांगतील गृहस्थाश्रम वेदाने श्रेष्ठ सांगितला आहे. तसे वागले म्हणजे देव आपल्या घरी चालत येईल; कुणी याग, कुणी हठयोग, तर कुणी जपतपादि साधने सांगतील. अशा मतामतांच्या गोंधळात आपण काय करावे ? तर ज्यांनी तो मार्ग चोखाळला आहे, त्यांनी काय केले ते पाहावे. असा मार्ग कुणी चोखाळला ? तर जे संत लोक आजपर्यंत झाले त्यांनी. त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे. म्हणून ते काय सांगतात ते पाहावे.

आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो. जिथे चार वाटा फुटतात तिथे पाट्या लावलेल्या असतात, आणि जिकडे जायचे ते त्यावर लिहिलेले असते. समजा आपल्याला पंढरपूर जायचे आहे; आता केवळ एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का ? पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्याने जावे, तसेच आपले झाले आहे. आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आहोत, आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो आहोत. म्हणूनच, संत सांगत असतात त्या वाटेनेच जाण्याचा निश्चय करावा, आणि तो मार्ग जरी कठीण वाटत असला, तरी तो देवाकडे जातो हे लक्षात ठेवावे.

संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे; पडण्याची, अडखळण्याची भितीच नाही.


Back to top button
Don`t copy text!