प्रवचने – दास विषयाचा झाला। सुखसमाधानाला आंचवला॥

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय ॥

त्यातच देहाला दुखणे । म्हणजे दुःखाचा कळस होय ॥

मिठाचे खारटपण । साखरेचे पांढरेपण ।

यांस नसे वेगळेपण । तैंसे देह आणि दुःख जाण ॥

देहाने जरी सुदृढ् झाला । तेथेही दुःखाचा विसर नाही पडला ॥

सांवली जशी शरीराला । तैसा रोग आहे शरीराला ॥

रामकृष्णादिक अवतार झाले । परी देहाने नाही उरले ॥

स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई । परि वियोगाचे दुःख अनिवार होई ॥

देहदुःख फार अनिवार । चित्त होई अस्थिर ॥

देहाचे भोग देहाचेच माथी । ते कोणास देता येत नाहीत । कोणाकडून घेता येत नाहीत ॥

आजवर जे जे काही आपण केले । ते ते प्रपंचाला अर्पण केले । स्वार्थाला सोडून नाही राहिले ॥

अधिकार, संतति, संपत्ति । लौकिकव्यवहार, जनप्रीति, ।

या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापरते । अखेर दुःखालाच कारण होते ॥

जो जो प्रयत्‍न केला आपण । तेच सुखाचे निधान समजून ।

कल्पनेने सुख मानले । हाती आले असे नाही झाले ॥

ज्याचे करावे बहुत भारी । थोडे चुकता उलट गुरगुरी ।

ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन । हे ओळखून वागावे आपण ॥

प्रपंचात आसक्ती ठेवणे । म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे ।

म्हणून आजवर खटाटोप खूप केला । परि कामाला नाही आला ॥

विषयातून शोधून काढले काही । दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही ॥

म्हणून प्रपंचाने सुखी झाला । ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला ॥

ज्याची धरावी आस । त्याचे बनावे लागे दास ॥

दास विषयाचा झाला । तो सुखसमाधानाला आचवला ॥

ज्या रोपट्यास घालावे खतपाणी । त्याचेच फळ आपण घेई ॥

विषयास घातले खत जाण । तरी कैसे पावावे समाधान ? ॥

प्रपंचातील संकटे अनिवार । कारण प्रपंच दुःखरूप जाण ॥

आजवर नाही सुखी कोणी झाला । ज्यानी विषयी चित्त गुंतविले ॥

कडू कारले किती साखरेत घोळले । तरी नाही गोड झाले ।

तैसे विषयात सुख मानले । दुःख मात्र अनुभवास आले ॥

प्रपंचातील उपाधि । देत असे सुखदुःखाची प्राप्ति ॥

संतति, संपत्ति, वैभवाची प्राप्ती, । जगांतील मानसन्मानाची गति, ।

आधुनिक विद्येची संगति, । न येईल समाधानाप्रति ॥

प्रपंचातील सुखदुःखाची जोडी । आपणाला कधी न सोडी ॥

नामातच जो राहिला । नामापरता आठव नाही ज्याला ।

परमात्मा तारतो त्याला । हाच पुराणीचा दाखला ॥

नका करू आटाआटी । राम ठेवावा कंठी ॥


Back to top button
Don`t copy text!