प्रवचने – मुखी नाम, नीतिचे आचरण, हृदयी भगवंताचे प्रेम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हृदयात राम आहे खास. ज्याच्या हृदयात राम आहे, तो राम म्हणूनच मी पाहतो. प्रपंचामध्ये जोपर्यंत आपण भगवंत आणला नाही, तोपर्यंत प्रपंचाला पूर्तता नाही आली. प्रपंचाचे आपण मालक बनू या; प्रपंचाचे गुलाम नाही आपण बनू. जो प्रपंचाचा गुलाम बनेल त्याला समाधान कसे मिळेल ? सुख हे लोकांकडून मिळते. समाधान हे अंतर्यामातून मिळते. लोकांकडून येते ते सुख, आतून येते ते समाधान. समाधान दुसर्‍यावर अवलंबून नसते. ते माझे मला मिळविता आले पाहिजे. समाधान हे देण्यासारखे नाही, आणि घेण्यासारखे नाही. माझी वासना माझ्या ताब्यात असली पाहिजे, ज्याने परमात्म्याला आपला म्हटला, त्याची वासना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.

प्रपंच टाका असे मी कधीच सांगत नाही. प्रपंच टाकून परमार्थ मिळत नाही अशी माझी खात्री आहे. प्रपंच असला पाहिजे असेही नाही. प्रपंच नसला तरी चालेल, आणि असला तरी बिघडत नाही. प्रपंच करा, पण समाधान ठेवा. मुखाने भगवंताचे नाम, नीतिचे आचरण, आणि हृदयात भगवंताचे प्रेम ठेवा. इतर कशाने साधता येणार नाही ते प्रेमाने साधेल. आपण जसे आपल्या आई-बापांवर, मुलाबाळांवर, प्रेम करतो तसे भगवंतावर प्रेम करावे. ज्ञानेश्वरांचे जाऊ द्या, ते विद्येचे सागर होते, परमात्मस्वरूप होते; पण तुकारामांजवळ काय होते ? तुकारामांजवळ अशी काय विद्या होती ? पण त्यांनी देवावर किती प्रेम केले ! आज लाखो लोक पंढरीला जातात, ही त्याची साक्ष आहे. तसे प्रेम करायला तुम्हा शिका. घरात असे वळण ठेवा की सर्वांचे भगवंताकडे लक्ष लागेल. भाषा गोड असावी, कधी कडू नसावी; लोण्यासारखी असावी. शिव्या दिल्या तरी त्या भाषेमध्ये गोडी आहे असे वाटावे; रागावला तरी त्यात गोडी आहे असे वाटावे. भाषा गोड व्हायला आपण निःस्वार्थी बनल्याशिवाय नाही येणार. गोकुळासारखे घर असले तर असू द्या, पण गोकुळाला शोभा आणणारा परमात्मा त्यात पाहिजे. गरिबी कितीही असली तरी ते घर सुखरूप दिसेल खास. आम्हाला भगवंताचे खरे प्रेम असेल, तर आम्ही त्याच्याकडून प्रपंचातली काही अपेक्षा करणार नाही. चोराने चोरीचा नवस केला, आणि प्रापंचिकाने प्रापंचिक गोष्टीकरिता नवस केला, काय फरक आहे ? दोघांनाही भगवंत नको आहे ! भगवंताचा विसर यासारखे पाप नाही, भगवंताचे स्मरण यासारखे पुण्य नाही. ते स्मरण आपण अखंड राखण्याचा प्रयत्‍न करू या. नामात राहू या, म्हणजे आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला बरोबर होईल.


Back to top button
Don`t copy text!