गुरुआज्ञेप्रमाणे वागणार्याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते. तसे, गुरूचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणार्याला कसली नड असणार ? लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते, परिसापाशी सोने व्हायला रुप्याचे लोखंड व्हावे लागते; तसे, गुरूचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते, ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच होय. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवीत असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही, तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी.
आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास ठेवतो, याचे कारण असे की, आपल्याला जगायची इच्छा आहे. तसे, भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा, मग कृती, आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव, असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जर भगवंतावर ठेवलीत, तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल. आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो, त्याप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ रहावे. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रेद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालावयाचे नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणार्याची जर खरी श्रद्धा असेल; तर त्या श्रद्धेनेच त्याच्याअंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली, तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही, तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनू या. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे, पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे.
आपण परमात्म्याजवळ मागावे की, “तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुजजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे, आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे.”