प्रवचने – सद्‍गुरूची कामगिरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सद्‍गुरूची कामगिरी कोणती ? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्‍गुरू सांगतात; आपले चुकते कुठे ते सद्‍गुरू सांगतात. सद्‍गुरू आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला ! सद्‍गुरू जागे करण्याचे काम करतात. मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले, त्याने सद्‍गुरू खरोखर केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तू गृहस्थ ‘मी स्वस्थ आहे’ असे म्हणतो, पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते तो पर्यंत तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार.

शिष्याच्या भावनाच गुरूला गुरुपद देतात. जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्‍गुरू उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरू. जे चिरकाल टिकते ते गुरुपद समजावे. खरोखर, सद्‍गुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरूने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन. संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे. पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्ये ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो, त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फळाची आशा आपोआपच सुटेल. आपले कर्तव्य कोणते ते सद्‍गुरू आपल्याला दाखवून देतात.

रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल, तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ ‘गाडी माझी आहे’ म्हणून ती मालकाला चालविता येणार नाही. साधी बैलगाडी सुद्धा चालविता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवितो, आणि खड्ड्यामध्ये पडतो. सद्‍गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे, मग कसलाच धोका उरणार नाही; आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार, अशी वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल.मनाची ही वृत्ती झाली की, जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल. असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे.


Back to top button
Don`t copy text!