स्थैर्य, दिल्ली, दि.३: संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. कोरोनामुळे सभागृहाच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे. लोकसभा व राज्यसभा सचिवालय अधिसूचनेनुसार दोन्ही सभागृहांचे कामकाज कोणतीही सुटी न घेता म्हणजे शनिवारी आणि रविवारीही हाेईल. संसदेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होत आहे. तसेच अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास नसेल. याला विरोधकांनी विरोध दर्शवला आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, लोकशाही आणि विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी महामारीचे निमित्त केले जात आहे. संरक्षणमंत्री आणि लोकसभेतील उपनेते राजनाथसिंह यांनी अनेक विरोधी नेत्यांशी चर्चा करत अधिवेशनात खासदारांना आपले म्हणणे आणि प्रश्न मांडता यावेत म्हणून शून्य प्रहराचा समावेश करण्याचे आश्वासन दिले आहे.
२ टप्प्यांत सभागृह कामकाज
> राज्यसभा सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत. लोकसभा दुपारी ३ ते सायं. ७ पर्यंत.
> फक्त १४ सप्टेंबरला पहिल्या दिवशी राज्यसभा दुपारी ३ ते ७ पर्यंत चालेल. लोकसभा कामकाज ९ ते १ राहील. त्यानंतर दुपारी ३ पासून सायंकाळी ७ पर्यंत चालेल.
> खासगी विधेयक मांडता येणार नाही. शून्य प्रहराचा वेळ एक तासाऐवजी अर्धा तास केला जाऊ शकतो.