स्थैर्य, फलटण, दि.१८: गोखळी ता.फलटण येथील युवक गावातील कोरोना हद्दपार करण्याच्या उद्देशाने पुढे आले असून येथील कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी त्यांनी ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून ग्रामपंचायतीची नवीन इमारत व प्राथमिक शाळा याठिकाणी एकूण 20 बेडचे विलगीकरण कक्ष सुरू केले. यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीचे आजीमाजी पदाधिकारी,गावातील डॉक्टर्स, दानशूर व्यक्ती आणि आरोग्य विभाग यांची मदत घेतली आहे.
तरुणांच्या आवाहनाला गोखळीकरांनी भरघोस प्रतिसाद देत कोणी आर्थिक तर,कोणी वस्तू रूपाने मदत केली. गावातील डॉक्टरांनी रूग्णांसाठी आपली मोफत वैदयकीय सेवा देण्याची तयारी दर्शवल्याने या कामाला चांगलीच गती मिळाली आणि विलगीकरण कक्ष कार्यान्वित झाले. या विलगीकरण कक्षात 17 रूग्ण दाखल झाले असल्याचे ग्रामविकास अधिकारी गणेश दडस यांनी सांगितले. डॉ.शिवाजी गावडे,डॉ.अमोल आटोळे, डॉ.नितीन गावडे,डॉ.विकास खटके यांच्यासह गोखळी आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सानिया शेख,आरोग्य सेविका लोंढे,आशा वर्कर्स सौ.दुर्गा आडके हे सर्वजण विलगीकरणात दाखल झालेल्या रूग्णांना दररोज भेट देऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून मोलाचं योगदान देत आहेत. तसेच सोमनाथ वायसे, गोरख हरीहर यांनी रूग्णांची मोफत रक्त तपासणी करून देण्याचे मान्य केले आहे.तर गोखळीचे माजी सरपंच नंदकुमार गावडे यांनी रुग्णांना लागणारी औषधे पुरवत आहेत तर,पै. दीपक चव्हाण यांनी गॅस शेगडी दिली असून ते रुग्णांना दररोज अंडी,चहा,नाष्टा पुरवत आहेत.
येथील कोरोना विलिनीकरण कक्ष उभारण्यासाठी सरपंच सौ.सुमनताई गावडे, उपसरपंच डॉ अमित गावडे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे,माजी उपसरपंच राधेश्याम जाधव,ग्रामपंचायत सदस्य अभिजित जगताप,शांताराम गावडे,पोलीस पाटील विकास शिंदे,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर गावडे, ग्रामविकास अधिकारी गणेश दडस यांच्यासह राहुल भारती,ज्ञानेश्वर घाडगे,ओम बझारचे धनंजय गावडे,प्रशांत गावडे,योगेश भागवत, अमोल हरीहर,सचिन धुमाळ,गणपत डुबल, संतोष गावडे,हणमंत हरीहर,अभिजीत जगताप या युवकांनी विशेष प्रयत्न केले.