दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । दिवाळीसाठी राज्यातील सात कोटी रेशनकार्ड धारकांना अवघ्या शंभर रुपयात प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि तेलाचे पॅकेज देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा – शिवसेना युती सरकारचे अभिनंदन करतो. या संवेदनशील निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाची दिवाळी गोड होईल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केली.
मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कोरोनाच्या संकटातून आपण सर्वजण बाहेर पडत असून समाजात नवा उत्साह निर्माण झाला आहे. भाजपा – शिवसेना युती सरकारने निर्बंध उठविल्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्री हे सण दोन वर्षांनी उत्साहात साजरे झाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे दिवाळीही उत्साहात साजरी होणार आहे. हे सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे सरकार आहे.
ते म्हणाले की, पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्याचाही महत्त्वाचा निर्णय भाजपा – शिवसेना युती सरकारने घेतला आहे. ऊन, पाऊस, थंडी, वारा याची पर्वा न करता सदैव दक्षतेने नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलीस दलाला दिलासा देणारा हा निर्णय आहे.
त्यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाने भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. तसेच उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील विभागांना उपयुक्त ठरणाऱ्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता व याचा ८ दुष्काळी तालुक्यांना फायदा होणार आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पास गती देण्यासाठी सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.