दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२२ । सातारा । आयुष्यभराचा अनुभव गाठीशी घेवून कोणत्याही प्रकारची कटुता मनात न ठेवता ज्येष्ठांनी रोजचा दिवस आनंदाने साजरा करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या समता पर्व कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी गोडोली, विलासपूर येथील अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या व्यासपीठावर विशेष कार्यक्रमप्रसंगी श्री. उबाळे बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, ज्येष्ठांनी आपल्या आयुष्यातील अनुभवांचा उपयोग करुन आपले दैनंदिन जीवन आनंदाने साजरे करावे. त्याउपर ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणींसंदर्भात समाज कल्याण कार्यालय समन्वयकाचे भूमिकेमध्ये आहे.
कार्यक्रमप्रसंगी प्रा. निरंजन फरांदे म्हणाले, ज्येष्ठ होवूनही मारुती चितमपल्ली, डॉ. आ. ह. साळुंखे, एन. डी. पाटील यांनी आपली जिज्ञासा आणि अभ्यासू वृत्ती कायम ठेवली. त्याचा उपयोग समाजाच्या उत्कर्षासाठी केला. आपण ज्येष्ठ झालो म्हणजे आपण अडगळीत पडलो अशी भावना मनात न आणता जीवनाकडे समरसून पाहिले तर आनंदी जगण्यासाठीचे परिमाण सहज सापडतील.
यावेळी अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ मोटे, सचिव पांडुरंग बिचकर, सहसचिव शशिकांत पारेख तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष प्रल्हाद साठे यांनी मानले.