ज्येष्ठ कर सल्लागार, साहित्यिक, चित्रपट निर्माते अरूण गोडबोले यांचे निधन


स्थैर्य, सातारा, दि.14 ऑक्टोबर : येथील ज्येष्ठ कर सल्लागार, साहित्यिक, चित्रपट निर्माते आणि सातारा शहरातील ज्येष्ठ सामाजिक नेते अरुण रामकृष्ण गोडबोले (वय 82) यांचे आज (दि. 14) रोजी दुपारी चारच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मागे बंधू अशोक व डॉ. अच्युत, पत्नी अनुपमा, मुलगा उदयन, सून संजीवनी, एक मुलगी डॉ. गौरी ताम्हणकर, जावई डॉ. हेमंत ताम्हणकर, पुतणे प्रद्युम्न व डॉ. चैतन्य, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

येथील दि युनायटेड वेस्टर्न बँक, आयुर्वेदिय अर्कशाळा, सज्जनगडचे समर्थ सेवा मंडळ, अंत्यसंस्कार सहायक मंडळ अशा अनेक संस्थांमधून त्यांनी विविध पदांची जबाबदारी पेलली. चित्रपट निर्माते म्हणूनही त्यांनी वेगळा ठसा उमटविला. कविता, प्रवासवर्णन, ललित, संत साहित्य, अशा विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. कौशिक प्रकाशन या संस्थेमार्फत त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली. सर्व वयातील सातारकरांसाठी आजातशत्रू आणि कोणाचे प्रेमळ आजोबा, कोणाचे प्रेमळ काका तर कोणाचा दिलदार मित्र अशा भूमिका त्यांनी विशेषत्वाने व ठरविलेल्या सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून सुरू करण्यात आलेला रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट चा वटवृक्ष करण्यामध्ये अरुण रावांचे विशेष योगदान होते .राजकारण असो चित्रपट क्षेत्र असो की साहित्य क्षेत्र असो सर्वच महानीय व्यक्तींच्या आवडीचा असा हा सातारचा मित्र म्हणून अरुण रावांची ख्याती होती.

स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यासोबत त्यांनी केलेले वार्तालाप, चर्चा, मुलाखती, पंडित प्रभाकर कारेकर यांना हट्टाने तब्बल 35 वर्षे एकाच दिवशी एकाच ठिकाणी गायला लावलेली संगीतमैफल संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज संगीतकारांना एकत्र आणून सातारच्या शाहू कला मंदिरात सादर केलेले विविध कार्यक्रम समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध आणि मनाच्या श्लोकावर केलेले विशेष निरूपणही अनेकांना भावत होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन अरुण काकांनी फेसबुकच्या माध्यमातून हजारो फॉलोवर्स जोडले होते .

अगदी धार्मिक स्वरूपाचे विवेचन असू किंवा शहरात एखाद्या गरीब आणि गरजू कुटुंबासाठी अगदी जळीतग्रस्तांसाठी उभ्या केलेली मदतीची हाक असो यामध्ये अरुणकाका नेहमीच पुढे असत. सातत्याने समाजाचा विचार करत अगदी काही वेळेला राजकारण क्षेत्रातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी ना ही दमटावून किंवा समजावून सांगत त्यांच्याकडून हिरीरीने आणि आग्रही भूमिकेने अरुण काकांनी अनेक शहराच्या विकासाच्या करिता कामे करून घेतली.

श्रीनिवास पाटील साहेबांसारखा सच्चा मित्र तसेच दररोजच्या मॉर्निंग वॉक मधून गोळा केलेले अनेक मित्र भले तो अर्धा कप चहाचा सोबती असो मात्र, अरुण काकांची ही फेरी कधीच चुकली नाही आपले धकटे बंधू डॉक्टर अच्युत यांना सातारची जबाबदारी अर्थात नगराध्यक्षपद स्वीकारण्यासाठी केलेली आग्रहाची विनंती खर्‍या अर्थाने सातारकरांसाठीही शहराच्या विकासालाच कारणीभूत ठरणारी होती अनेक वेळेला सज्जनगड येथील दासनोमी उत्सवाच्या सांगितिक कार्यक्रमांसाठी अरुण काकांनी केलेले नियोजन हे कौतुकास पात्र ठरणारे होते, त्यामुळेच अनेक दिग्गज हेच समर्थ चरणी सज्जनगड येथे येऊन आपली सेवा देऊ शकले होते.

अनेक कार्यक्रमात स्वतः कधीही सहभागी न होता त्या कार्यक्रमाचा पूर्ण सूत्रसंचालनाचा खंबीर पाया आणि भक्कम मार्गदर्शन हे अरुण गोडबोले करीत होते ,ही त्यांची खासियत होती आणि त्यामुळेच ..दास डोंगरी राहतो उत्सव देवाचा पाहतो.. असे त्यांच्याकडून सांगितले जाई.
अनेक कार्यक्रमात त्यांचे न दिसणेही अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारे असे मात्र संपूर्ण छत्रपतींच्या राजघराण्याशीही मैत्रीपूर्ण वातावरण ठेवून संबंध राखत त्यांनी अनेकदा ज्येष्ठांना केलेल्या आग्रही सूचनांचेही तंतोतंत पालन केले जाई. त्यामुळे खर्‍या अर्थाने शनिवार पेठेतील गोडबोले वाड्यातील हे एक परिपूर्ण व्यक्तिमत्व आणि आमच्या घरातलाच एक सोबती हरपल्याची भावना मंगळवारी सायंकाळी सातारकरांमध्ये उमटली होती


Back to top button
Don`t copy text!